महाराष्ट्रातील या जिल्ह्यात 167 जणांना सर्पदंश, ५ जणांचा मृत्यू
पावसाळ्यात जमिनीत दडून बसलेले साप बाहेर पडतात. त्यानंतर ते उष्ण व दमट जागेचा आश्रय घेण्यासाठी धडपडतात. दरवर्षी पावसाळ्याच्या कालावधीत सर्पदंशाने लोकांच्या मृत्यू घडून येतात. साधारण पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत सापांपासून काळजी घेणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील 6 महिन्याच्या कालावधीत 167 नागरिकांना सर्पदंश झाला असून, यातील 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या तत्परतेने वेळीच उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
आदिवासीबहूल गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त आहे. बहुतांश घरे जंगलाला लागून आहेत. त्यामुळे साप अनेकदा वस्तीकडे धाव घेतात. तसेच जिल्ह्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती तसेच रानावनाशी नागरिकांचा संपर्क येतो. – अशावेळी सांपांपासून धोका होण्याची शक्यता असते. जिल्ह्यात जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीत 167 नागरिकांना सापाने दंश केल्याची नोंद आहे. यामध्ये 5 जणांना प्राण गमवावे लागले आहे. सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना जून महिन्यात घडून आल्या आहेत. या महिन्यात 49 संर्पदशांच्या घटना घडल्या असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सापांविषयी वाढलेल्या जागरूकतेमुळे मृत्यूच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे.
जिल्ह्यात सापाच्या 4 विषारी प्रजाती
आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने सापाच्या 4 विषारी प्रजाती आढळून येतात. यामध्ये नाग, मण्यार, घोणस व क्वचितच आढळून येणाऱ्या फरसे या सापाचा समावेश आहे. सौम्य विषारी सापांमध्ये मांजऱ्या. हरणटोळ यांचा तर बिनविषारी सांपामध्ये धोंड्या, धामण, नानेटी (वासया), डुरक्या घोणस (चिखल्या), कुकरी, कवड्या, धूळ नागीण, रूका, तस्कर आदी सापांचा समावेश होतो.
सर्पदंश टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
घरात, घराबाहेर अनावश्यक वस्तुंचा ढीग करू नये, सांडपाण्याचे पाईप उघडे न ठेवता जाळ्या लावावे, घराच्या खिडक्यांपर्यंतच्या झाडांच्या फांद्या कापाव्यात, खिडक्यांना जाळी बसवावी, रात्री बाहेर जाताना टॉर्च हवा, घराबाहेर उजेड असावा, शेतात काम करताना बुट घालावे, गवत कापताना खात्री करावी, अडगळीतले सामान काढताना दक्षता घ्यावी. सर्पदंश झाल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात जावे, साप आढळल्यास सर्पमित्रांना संपर्क करावा.
6 पावसाळ्यात शहरी तसेच ग्रामीण भागात नसतात. मात्र, सापांमुळे धोका उद्भवतो या भावनेने नागरीक सापांना मारतात. यात दुर्मिळ सापांचाही बळी जात आहे. सापाला घाबरुन जात त्याच्यावर हल्ला चढवून स्वतःचा जीव धोक्यात घालून नये. तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावे.
– अजय कुकूडकर, सर्पमित्र, गडचिरोली.
जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील सर्व जिल्हा आरोग्य यांचे अंतर्गत 52 प्रा. आ. केंद्राअंतर्गत 33 आरोग्य पथके यामध्ये सर्पदंश विषयक औषधीसाठा मुबलक प्रमाणात पुरविण्यात आलला असून, सर्पदंश रुग्णांवर सर्व आरोग्य संस्थामध्ये उपचार करण्यात येत आहे. उपचारासंदर्भाने सर्व वैद्यकीय अधिका-यांना प्रशिक्षण दिले आहे. सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूकरीता नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. सर्प दंश बचाव, प्रथमोपचार, उपचाराबाबत स्थानिक बोलीभाषेमधून ऑडीओ क्लीप, पोस्टर, बॅनर आदीच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे.
– डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी