स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरच्या मानांकनात सुधारणा : केंद्राकडून चूक कबूल
केंद्रीय आवास व शहरी कार्य मंत्रालयाने मागील १७ जुलै रोजी देशभरातील स्वच्छ शहराचे गुण व मानांकन घोषित केले. यात नागपूरला २७ वा क्रमांक देण्यात आला होता. या स्वच्छ सर्वेक्षणात घराघरातून कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेला केवळ ३० टक्के गुण देण्यात आले होते तर घराघरातून कचरा वर्गीकरणासाठी केवळ १ टक्का गुण देण्यात आले होते तर कचरा मुक्त शहर श्रेणीत ० गुण देण्यात आले. ही बाब महापालिकेच्या जिव्हारी लागली होती. १७ जुलैच्या निकालात नागपूरला मिळालेल्या गुणांच्या बेरजेत त्रुटी असल्याचे मनपा प्रशासनाने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. अखेर केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने चूक मान्य करीत गुणांची पुनर्तपासणी केली आणि नागपूर शहराला २२ ए क्रमांक दिला.
महापालिकेलाही केंद्राची ही भूमिका ‘मकबूल‘ झाली अर्थात आवडली. आयुक्तांनी मनपा भविष्यात अधिक प्रयत्न करून स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नागपूरचा रँक प्रथम दहा क्रमांकात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नमुद केले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ चे सुधारित निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले आहेत. स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर महानगरपालिकेला १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहर या गटात सुधारणेनंतर २२ वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
इतर शहरांचे मानांकन न घसरण्याची काळजी
नागपूर शहराचे मानांकनात सुधारणा करतानाच केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे इतर शहरांचे मानांकन घसरणार नाही, याची काळजी घेतल्याचे ‘२२ ए’ अशाप्रकारे दिलेल्या मानांकनावरून दिसून येत आहे. २३, २४
मानांकन असलेल्या शहराचे स्थान कायम राहील, यासाठी ‘२२ ए’ मानांकन दिल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता २२ व्या क्रमांकावर असलेल्या नाशिक शहरापेक्षा नागपूरचा क्रमांक असून २३ क्रमांकावरील मेरठ्या पुढे नागपूर आहे.
कचरा संकलनात मिळाले आता ९० गुण
यापूर्वी जाहीर निकालात घराघरातून कचरा संकलनात ३० टक्के गुण प्राप्त झाले होते, त्यात आता सुधारणा झाली असून ९० टक्के गुण प्राप्त झाले आहे. याशिवाय कचरा वर्गीकरणात केवळ १ टक्के गुण देण्यात आले होते, सुधारणेनुसार आता यात ६० टक्के गुण मिळाले आहे. नागपूरला जीएफसी स्टार रेटिंगमध्ये अर्थात कचरामुक्त शहराच्या श्रेणीत यापूर्वी ० गुण होते. आता यात ५०० गुण मिळाले असून १ स्टार प्राप्त झाले आहे. तर ओडीएफ सर्टिफिकेटमध्ये वाटर प्लस प्रमाणपत्र मिळाले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५च्या निकालात नागपूरला मिळालेल्या गुणोध्या बेरजेत त्रुटी आढळल्याने मनपा प्रशासनाने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार गुणांची पुनर्तपासणी करण्यात आली असून, आता सुधारित निकालानुसार मनपाची रैंकिंग २७ व्या स्थानावरून थेट ‘२२ ए’ वर आली आहे.
-डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, मनपा