
फोटो सौजन्य AI
दखलपात्र गुन्हे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यासंबंधीच्या कायद्यांतर्गत नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, रविवारी झालेल्या मनपा-पोलिस संयुक्त बैठकीत पोलिस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत अतिक्रमण नियंत्रण आणि गुन्हेगारी प्रतिबंधासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे,मनपाच्या १० झोनपैकी प्रत्येक झोनमध्ये दररोज अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाईल.
शहरातील सुमारे १०० किलोमीटरचा अतिक्रमित परिसर दररोज साफ करण्याचे लक्ष्य आहे. बैठकीत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून ते पादचाऱ्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि मोकळे केले पाहिजेत. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या चौकांसाठी प्रभावी पार्किंग व्यवस्था आणि आराखडे विकसित करण्यावरही भर दिला. ई-रिक्षा आणि ऑटो-रिक्षांसाठी निश्चित जागा ठरवण्याचे तसेच रस्त्यावर सिलिंडर ठेवून धोकादायक कृत्ये करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Nagpur News : आता वाळू लिलाव प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार
मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी महापालिकेच्या ‘मिशन १०० डे’ उपक्रमाची माहिती बैठकीत दिली. ही मोहीम पोलिस प्रशासनाच्या समन्वयाने पुढे नेली जाईल, सुरुवातीच्या टप्प्यात प्रमुख चौक, मोठी अवैध बाजारपेठ, फुटपाथ आणि प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांना लक्ष्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीला पोलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे, वसंत परदेशी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकित, मिलिंद मेश्राम, उपायुक्त मंगेश खवले, मनपाचे सर्व सहायक आयुक्त आणि पोलिस विभागाचे सर्व उपायुक्त उपस्थित होते.
शाळा आणि महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरातील अवैध पान दुकाने आणि अतिक्रमणांवर तत्काळ व कठोर कारवाई करण्याचे निर्देशही बैठकीत दिले, विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शैक्षणिक परिसराभोवती शिस्त राखण्यासाठी या क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले जाईल.
प्रशासनाने हे देखील स्पष्ट केले की, अतिक्रमण हटवण्याची कारवाई नियमांनुसार केली जाईल. कारवाई करण्यापूर्वी नियमांनुसार अनधिकृत विक्रेत्यांना नोटिसा बजावणे, कारवाईची माहिती देण्यासाठी त्यांच्यासोबत बैठका घेणे आणि संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत.