
All political parties have started campaigning for the Nanded Municipal Corporation elections
Nanded Politics : नांदेड : मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीला अधिकृत सुरुवात झाली असून, रविवारच्या सुट्टीचा पुरेपूर वापर करत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला. शहरातील प्रत्येक प्रभागात आज सकाळपासूनच राजकीय हालचालींना उधाण आले होते. भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा शिवसेना, वंचित, एमआयएम तसेच अपक्ष उमेदवारांनी पायी प्रचारफेऱ्या काढत “जनता जनार्दन” च्या दारात हजेरी लावली. तसेच कॉर्नर बैठका व डोअर टू डोअर प्रचार यंत्रणा विविध राजकीय पक्षांनी कार्यान्वित केल्यामुळे प्रचाराचा नारळ फोडण्याचे कार्यक्रम संपन्न झाले.
काही ठिकाणी प्रचारफेरी होती, तर काही ठिकाणी केवळ फोटोसेशन आणि सोशल मीडियासाठीचे व्हिडीओ शूटिंग सुरू होते.
मात्र, बाहेरून उत्साही दिसणाऱ्या या प्रचारामागे अनेक पक्षांत अंतर्गत धुसफूस अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. इच्छुक उमेदवार आणि अधिकृत उमेदवार यांच्यातील नाराजी पूर्णपणे मिटलेली नसून, अनेक ठिकाणी ‘मनधरणी अभियान’च – जास्त वेगात सुरू असल्याचे दिसून आले. कुठे मला बोलावले नाही, कुठे व्यासपीठावर – नाव घेतले नाही, तर कुठे हार घालायचा क्रम चुकला, कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज आणि उघड वाद रंगताना दिसले.
हे देखील वाचा : स्वच्छ शहराचा मुखवटा पडला गळून; इंदूरच्या दुषित पाणी प्रकरणाने वास्तव आले जगासमोर
काही प्रभागांमध्ये भाजपातील इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे अनेकांचा मनातील राग अजूनही शांत झालेला दिसून आलेला नाही. त्यामुळे असे कार्यकर्ते प्रचारापासून अलिप्त असून अनेक जण देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेले असल्याचे समजते.
उमेदवारांना फटका
शिवसेना शिंदे गटात आमदारांमधील अंतर्गत विसंवादाचा फटका उमेदवारांना बसत असल्याचे जाणकार सांगतात. काही उमेदवार मात्र आम्ही माजी नगरसेवक आहोत” या आत्मविश्वासावर पुन्हा मत मागताना दिसले. त्यांनी केलेली जुनी कामे पुन्हा आठवून देण्यावर भर दिला जात आहे. दुसरीकडे, नवे चेहरे असलेल्या उमेदवारांना अजूनही प्रचाराचा सूर सापडलेला नाही. अपक्ष उमेदवारांची अवस्था तर मी, माझा मित्र आणि बॅनर इतकीच मर्यादित असल्याचे दिसून येते.
अनेक बलाढ्य नेत्यांबरोबर राजकीय वाटाघाटी
एकंदरीत, नांदेडची ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्दवांवर नाही, तर व्यवस्थापन, मनधरणी, आणि हंगामी निष्ठांवरही लढली जात असल्याचे रविवारच्या या राजकीय गजबजीतून स्पष्ट झाले आहे. काही प्रभागातील उमेदवारांच्या बाबतीत विरोधकांकडून राजकीय अफवा सोडल्या जात असून उमेदवार मॅनेज होणार असल्याच्या अफवांचे पीक मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. तसेच शहरातील काही प्रभागांमध्ये सगळे सोयरे व आपल्या जवळचे नातेवाईक यांच्यासाठी अनेक पक्षातील नेते व कार्यकर्ते स्वतःच्या पक्षाला अडचणीत आणून फील्डिंग लावत असल्यामुळे क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणावर होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : भाजपच्या हातून परळी निसटली? पंकजा मुंडेंच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
यामध्ये प्रभाग क्रमांक एक, सहा व प्रभाग क्रमांक पाच यांचा समावेश होतो. अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व नेते इतर पक्षातील बलाढ्य नेत्याबरोबर राजकीय वाटाघाटी करून छुप्या पद्धतीने दुसऱ्या पक्षाचा प्रचार करून अनेक ठिकाणी विरोधकांना मदत करत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार अडचणीत आले आहेत.