
BJP did not give chance to BJP loyal Worker give opportunity to outsiders political news
Nanded News : नांदेड : सुनील जोशी : नांदेड महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर सोमवारी स्वीकृत सदस्य आणि महिला बालकल्याण तसेच स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्त्या झाल्या. स्वीकृत सदस्य निवडताना भाजपने (BJP Politics) उपऱ्यांसाठी मनपाचे दरवाजे उघडे केले. दुसरीकडे जे जुने निष्ठावंत आहेत, त्यांना अडगळीत टाकले आहे. भाजप नेतृत्वाला काँग्रेसमय भाजप करायची आहे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. (Nanded News)
महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपकडे इच्छुकांची संख्या अफाट होती. निवडणुकीत संभाव्य बंडखोरी मोठ्या प्रमाणात होईल, अशी भीती व्यक्त झाल्याने भाजपच्या नेतृत्वाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काहींना पदे दिली तर काहींना स्वीकृत म्हणून विचार करण्याचे आश्वासन दिले. मात्र स्वीकृतच्या वेळी नेमके उलटे घडले? त्यामागचे काय राजकारण आहे? हे न समजण्याइतकी नांदेडची जनता निश्चितच दुधखुळी नाही. सर्वश्री दिलीप कंदकुर्ते, अमित तेहरा, आशुतोष जोशी, अंकुश देवसरकर, सुप्रिया पाटील यांना भाजपने स्वीकृत सदस्य म्हणून मनपात नेले.
हे देखील वाचा : गॅस एजन्सीचालक मस्त, ग्राहक मात्र त्रस्त! भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहून गॅस मिळविण्याची वेळ
स्वीकृत निवडीमागे दबाव की राजकारण ?
यातील अमित तेहरा, सुप्रिया पाटील, आशुतोष जोशी आणि अंकुश देवसरकर यांचा भाजपशी काय संबंध? त्यांचे पक्ष वाढीसाठी काय योगदान ? अमित तेहरा हे भाजपचा काँग्रेसयुक्त चेहरा असल्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना स्वीकृत म्हणून मनपात स्थान देण्यात आले. कोण सुप्रिया पाटील? असेच यानिमित्ताने म्हणावे लागेल. माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या त्या सुनबाई, एवढीच त्यांची ओळख. त्यांची परिसरातही फारशी ओळख नसताना भाजप नेतृत्वाने त्यांच्यासाठी मनपाची दारे उघडी केली, हा ‘राजहट्ट’ कशासाठी? असा सवाल निष्ठावंत करीत आहेत. आशुतोष जोशी यांच्याही स्वीकृतची चर्चा सुरू आहे. यापूर्वी त्यांचे नाव कधीही ऐकले नव्हते. पक्षासाठी तर योगदान दूरच. कोण आहेत आशुतोष जोशी? यांचा राजकीय, सामाजिक इतिहास काय? याची तपासणी कोणी केली की नाही? का कोणाचा दबाव आला होता? अशा विविध चर्चा सुरू आहेत. आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात कोलांटउड्या मारणारे डॉ. अंकुश देवसरकर यांनाही स्वीकृतची संधी देण्यात आली. त्यांना उमेदवारी देताना त्यांच्याबद्दल समाजमन काय म्हणते? याकडे लक्ष देणे गरजेचे होते.
हे देखील वाचा : “एकनाथ शिंदेंचा पक्ष म्हणजे भाजपची अंगवस्त्र…; खासदार संजय राऊतांची खरपूस टीका
पुत्रा ऐवजी पिता
अंकुश देवसरकर यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी डॉ शुभांगी देवसरकर या इच्छुक होत्या, शुभांगी देवसरकर यांना डावलून डॉ. अंकुश देवसरक यांना प्राधान्य देण्यात आले. भाजपच्या एक वरिष्ठांशी असलेले जिगरीचे संबंध स्वीकृतीन बदलल्याची चर्चा आहे. दोन वेळेस विधानसभा निवडणूक, स्थायी समिती चेअरमन पद उपभोगलेल दिलीप कंदकुर्ते यांनी ही स्वीकृत सदस्य नको, अशी भूमिका घेतली होती. “मला नको, पण माझ्या मुलाला संधी द्या, अशी विनंती त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली मात्र त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून केंदकुर्ते यांनाच मनपात पाठविण्यात आले. मोठ मोठी पदे भौगलेल्या व्यक्तीने स्वीकृत म्हणून पुन्हा मनपात जाणे, अनेकांना खटकले आहे. एकूणच, मनपा स्वीकृत सदस्यांची निवड यावेळी चर्चेचा विषय ठरला आहे. कॉंग्रेस आणि एमआयएमने निष्ठावंत कार्यकत्यांन न्याय दिल्याची भावना पसरली असून, भाजपमध्य मात्र नाराजीचे वातावरण आहे.
काँग्रेस, एमआयएमने न्याय दिला
काँग्रेस आणि एमआयएमने अनुक्रमे मुन्ना अब्बास आणि मो. नासेर यांना स्वीकृत सदस्यपदी नेमून त्यांना न्याय दिल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. मुन्ना अब्बास हे जुने काँग्रेस कार्यकर्ते आहेत. मनपा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी जुन्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली. तर मो. नासेर यांना स्वीकृत सदस्यपदी मनपात पाठविले. नासेर यांनी मनपा निवडणुकीत पक्षासाठी सक्रिय प्रचार केला होता, त्याचे फळ त्यांना मिळाल्याची चर्चा आहे. मुन्ना अब्बास यांनीही कठीण काळात पक्षनिष्ठा सोडली नाही, त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आल्याचे बोलले जाते.