शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण
मुंबई : सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे. मात्र शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचा वापर करावा. शेतीचे आरोग्य संवर्धन उपाय होणे ही काळाची गरज आहे.. या सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील २,४५८ मेगावॅट क्षमतेच्या ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले.
राजस्थान बांसवाडा येथे ऊर्जा तसेच विविध विकास योजनांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण बांद्रा पूर्व प्रकाशगड येथून करण्यात आले. सौर ऊर्जा प्रकल्पाचे खूप फायदे आहेत. शेतकऱ्यांना शेतीला दिवसा वीज उपलब्ध होते आहे त्याच बरोबर बारमाही पाण्याची व्यवस्था झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. आता शेतकऱ्यांनी केमिकलमुक्त शेती करण्यावर भर दिला पाहिजे. झिरो कॉस्ट फार्मिंगला देखील महत्त्व दिले पाहिजे. झिरो बजेट नैसर्गिक शेती ही अशी शेती पद्धत आहे, ज्यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर कमी करून खर्च कमी केला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांची शेतीमध्ये आर्थिक गुंतवणूक वाचते आणि जमिनीचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर पारंपारिक शेतीऐवजी काळानुरूप बदलती शेती करणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताला आज एक लाख करोड खाद्यतेलाची आयात करावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी खाद्यतेल बियांची लागवड करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मिलेटचीदेखील सध्या खूप मागणी आहे हे लक्षात घेता त्या प्रकारच्या पद्धतीची पिके घेतली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांची आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल होईल. राज्याचे राज्यपाल आर्चाय देवव्रत यांचे नैसर्गिक शेतीवरील व्याख्यान शेतकऱ्यांनी जरूर ऐकावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना प्रकल्पाची यशोगाथा प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून जाणून घेतल्या. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील किकवारी येथील शेतकरी सुनील सिताराम काकुलते यांनी पीएम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत ४० एकर जमीन सिंचनाखाली आणली. यामुळे दरवर्षी दोन लाख रुपये उत्पन्न वाढले आहे. ५० ते ६० लोकांना यामुळे रोजगार प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील भेंडी महळ येथील शेतकरी तुषार वानखेडे यांनी १० मेगावॉट पीएम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची योजना ६.५ एकरामध्ये राबवली. यापूर्वी रात्री वीज नसल्यामुळे अडचणी निमार्ण होत होत्या. शेतीला पाणी कमी पडत असल्यामुळे हरभरासारखे पीक घेतले जात होते. आता पपई आणि केळीचे पीक घेऊन ३५ हजार ऐवजी ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे असे त्यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सतेफाड मधील सुरत जटाळे यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून पाच एचपीचा पंप बसवला. या योजनेमुळे त्यांच्या शेतीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली. पंप बसवल्यापासून त्यांचे वार्षिक उत्पन्न साठ हजार रुपयांवरून दीड लाख रुपयांपर्यंत गेले, असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतीमध्ये घरातीलच तीन व्यक्ती काम करत असून मुलाच्या शिक्षणासाठी आणि पुन्हा शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी आलेल्या नफ्याचा उपयोग करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील बापकाळ येथील शेतकरी ताई किशोर सावंत म्हणाल्या की, पीएम कुसुम बी – मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये दोन एकर क्षेत्रासाठी तीन एचपीचा सोलर पंप बसवला आहे. यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात वाढ झाली. त्याचबरोबर उरलेल्या विजेचा इन्हवर्टरच्या माध्यमातून घरात वापर करण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माई वस्ती पेठ येथील माधुरी धुमाळ यांनी पीएम कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेत दहा मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प १० एकर मध्ये उभारला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वार्षिक पंधरा लाख उत्पन्न या प्रकल्पातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाकवड येथील चंदू पावरा या शेतकऱ्यांने पीएम कुसुम बी- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ७.५ एचपी क्षमतेचा सौर कृषी पंप बसवला. त्यामुळे दिवसा वीज उपलब्ध होऊन पाण्याच्या उपलब्धतेमुळे मका, गहू, भुईमूग या पिकांची पेरणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील गोपाळ महल्ले यांनी पीएम कुसुम सी- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेत लाभ घेतला आहे. या सर्व प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला दरवर्षी पाच लाख रुपये मिळत असून या शेतकऱ्यांनी सतराशे लोकांना वीज पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांची विजेची समस्या सुटली. यामुळे या भागातील शेतकरी दिवसा वीज उपलब्ध होत असल्यामुळे आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.
पीएम कुसुम सी-मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेत सहा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. यामुळे ३२.०८ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे. तसेच इतर विविध योजनेतून राज्यात आतापर्यंत ६ लाख ४६ ६९४ सौर कृषी पंप बसविण्यात आले असून राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या योजनेमुळे २०.९५ लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे.