दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी इतक्या रुपयांची भाऊबीज भेट जाहीर
मुंबई : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी एकूण ₹४०.६१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी ‘शक्ती’ असून, त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल असा विश्वासही मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
या योजनेसाठी शासनाने ₹४०.६१ कोटी (₹४० कोटी ६१ लाख ३० हजार) इतका निधी मंजूर केला आहे. हा निधी एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांना वितरित केला जाणार आहे.
भाऊबीज भेट वेळेवर मिळावी म्हणून, निधीचे वितरण एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्या मार्फत केले जाणार आहे. जिल्हास्तरीय अधिकारी, प्रकल्प अधिकारी यांच्या देखरेखीखाली लाभार्थ्यांना रक्कम वेळेत पोहोचवली जाईल.
या निर्णयामुळे Anganwadi Sevika Bhaubij Gift 2025 लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. शासनाने नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीनंतर हा आदेश जारी केला आहे. या भाऊबीज गिफ्ट मुळे मुळे अंगणवाडी सेविकांच्या कामाचा सन्मान होईल आणि त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल अशी आशा आहे.
दरम्यान, अंगणवाडी सेविकांसाठी इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण अपेक्षित आहे, पण डीएड, पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणी, महिलांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. दुसरीकडे मदतनीस पदासाठी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण आवश्यक आहे, तरीपण या पदासाठी बारावी, पदवीप्राप्त तरुणी-महिलांनी अर्ज केल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात विधवा, परितक्त्या महिलांचाही समावेश आहे. शैक्षणिक कागदपत्रांनुसार उमेदवारांना १०० गुण दिले जातात. त्यात पूर्वी कोठे अध्यापन किंवा काम केल्याचा अनुभव असल्यास त्यालाही स्वतंत्र गुण आहेत. आता अर्ज करण्याची मुदत संपली असून सध्या अर्जांची छाननी व कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.