
फेरमतमोजणी पुन्हा होणार? नाशिकच्या प्रभाग २७ च्या अधिकाऱ्यांवर आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप
यावेळी मोर्चेकऱ्यांच्या हातातील फलकांनी लक्ष वेधून घेतले. तर जोपर्यंत फेरमतमोजणी होणार नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली होती. अपिलीय अधिकारी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी ४५ दिवसांच्या आत फेरमतमोजणी केली जाईल तसेच सरकारी वकीलही देऊ, असे आश्वासन दिल्यानंतर तब्बल चार तासांनी सायंकाळी ६ वाजता मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन मान्यवरांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची माहिती मोर्चेकऱ्यांना देऊन मोर्चा मागे घेत असल्याचे जाहीर केले.
आशा खरात यांनी नेमलेले उमेदवार प्रतिनिधी प्रशांत खरात यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक निर्णय अधिकारी पवन दत्ता यांनी कोणत्याही नियमांचे पालन केलेले आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांना केराची टोपली दाखवून कामकाज केले असून, यामागे विरोधकांकडून काही आर्थिक लाभ तर घेतला नाही? तसेच त्यांच्यावर भाजपा नेत्यांचा दबाव होता का? अशी शंका येण्यास जागा आहे. त्यामुळे दत्ता यांचे निलंबन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच या प्रभागातील फेरमतमोजणी करून जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर आणावे, अशी मागणी केली आहे.
घरकुल, दत्तनगर, चुंचाळे, अंबडगाव जनता स्वीट्स, संभाजी महाराज स्टेडियम, अंबड पोलीस ठाणे, गणेश चौक, भुजबळ फार्म, लेखा नगर, मुंबई नाका असा प्रदीर्घ मार्गक्रमण करत हा मोर्चा सीबीएस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. निवडणुकीच्या निकालावरून गिधालेले हा मोर्चा राजकीय वादळाची नांदी ठरणार असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे.