नावडे-रोडपाली वाहतूक कोंडी बनली 'वरदान'
पनवेल: “एकाचे दुःख हे दुसऱ्याला सुख” अशा प्रकारच्या म्हण मराठीत प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या मुंब्रा पनवेल महामार्गावर नावडा फाटा ते रोडपाली सिग्नल दरम्यान वाहन चालवणारे वाहन चालक घेत आहे या ठिकाणी वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांच्या इंधनाचा आणि वेळेचा मोठा अपव्य होत असताना तासंतास वाहतूक कोंडीत अडकलेल्या भुकेल्या वाहन चालकांची भूक भागवण्यासाठी भेळ आणि चहाची विक्री करून काही व्यवसायिक दररोज हजारो रुपयांचा फायदा घेत असून, वाहन चालकांचा होणारे नुकसान हे या व्यावसायिकांच्या पथ्यावर पडत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
पनवेल मुंब्रा महामार्गावर नावडे ते रोडपाली सिग्नल दरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या मुळे अर्धा किलोमीटर असलेले हे आंतर कापण्यासाठी अनेकदा तासा भराचा कालावधी लागत आहे.याचाच फायदा उचलत वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांची भूक भगवन्यासाठी भेळ विक्री करणाऱ्या व्यावयिकांनी या ठिकाणी आपले मार्केट बसवल्याचे पाहायला मिळत आहे. सद्य स्थितीत या ठिकाणी जवळपास 8 विक्रेते भेळ विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
दुपारी 1 ते रात्री उशिरा पर्यत 20 रुपये दराने भेळ विक्री करणारे हे व्यावसायिक वाहन चालकांची भूक भागवत दररोज 700 ते 800 रुपये कमाई करत आहेत. तर काही चहा विक्रेते देखील वाहतूक कोंडीचा फायदा उचलत चहा विक्री करून मालामाल होत आहेत.एकीकडे वाहनचालकांचे इंधन आणि वेळ वायाला जात असताना. दुसरीकडे वाहतूक कोंडीचा फायदा भेळ आणि चहा विक्रेत्यांना होत आहे.
पनवेल मुंब्रा महामार्ग वाहतूक कोंडीच्या फेऱ्यांमध्ये अडकला आहे. नावडे ते रोडपाली सिग्नल हे एक किलोमीटरच्या अंतर कापण्यासाठी कधी कधी जवळपास एक तास लागत आहे. या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षित पणाचा हा परिपाक आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात एम एस आर डी सी च्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पनवेल- मुंब्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते, विशेष करून उत्तरेकडील राज्यातील अनेक मालवाहतूक करणारे वाहन जेएनपीटी आणि दक्षिणेकडे जातात. याशिवाय पुणे बाजुकडेही याच महामार्गावर वाहतूक होते. दरम्यान न्हावडे ब्रिजच्या खालून येणारी वाहने आणि उड्डाण पुलावरून खाली उतरणारी वाहतूक एकत्र येते. त्यामुळे रोडपाली सिग्नल पासून मागे न्हावडे पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.
पुलाखालील रोड वरून येणारे वाहने डाव्या बाजूने कासाडी नदीच्या पुलापर्यंत जाऊ शकतात. बाजूच्या साईड पट्टीवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामध्ये वाहने जाऊ शकत नाहीत. म्हणून साहजिकच दोन लेनवरूनच वाहनांना पुढे जावे लागते. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाला पत्र दिले आहे.
आय आर बी कडून कधी कधी या खड्ड्यांमध्ये मुरूम , माती भरून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. परंतु या साईड पट्टीवर डांबरीकरण केल्यास ब्रिज खालून येणाऱ्या वाहनांना एक लेन मिळू शकते अशी उपाययोजना पाटील यांनी निवेदनाद्वारे सुचवली आहे.
रोडपाली सिग्नल ला डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते इतके मोठे आहेत की त्यातून वाहने जाऊ शकत नाही. त्यामुळे लेफ्ट साईटला म्हणजेच स्टील मार्केट आणि तळोजाकडे जाणाऱ्या वाहनांना सिग्नलच्या पुढे जाऊन लेफ्ट टर्न घ्यावा लागतो. हे खड्डे बुजवल्यास सिग्नलच्या अगोदरच वाहनांना डाव्या बाजूला वळता येईल अशी मागणी ही पाटील यांनी केली आहे.
पनवेल मुंब्रा महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबर मध्ये ऑपरेट होत आहे. त्या ठिकाणी कार्गो सुद्धा आहे. परिणामी मालवाहतूक आणखी वाढणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीतही भर पडेल. नावडे उड्डाणपूल ते रोडपाली सिग्नल यादरम्यानच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना पत्राद्वारे रस्ते विकास महामंडळाला सुचवले आहे. परिणामी वाहतूक कोंडी टळेल त्याचबरोबर अपघातही घडणार नाहीत.