पनवेलच्या बालसुधार गृहातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बालसुधारगृहातून पाच मुली पळून गेल्या होत्या. या मुलींपैकी तीन मुलींना शोधून काढण्यात यश आले आहे तर, २ मुली सापडल्या नाही आहे. ही घटना रविवारी घडली. या मुलींना शोधण्यासाठी पनवेल शहर पोलिसांनी जंगजंग पछाडले. मुलींनी या संदर्भात कबुली देताना पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे.
नेमकं काय घडल?
पनवेलमधील बालसुधारगृहातून रविवारी पाच मुली पळून गेल्या होत्या. या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी १२ ते १७ वयोगटातील या मुलींचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यानंतर,पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे पोलिस आणि मुलींच्या नातेवाईकांच्या मदतीने आणि इतर सूत्रांच्या मदतीने काही तासांतच तीन मुलींना सुरक्षितपणे शोधून काढले. तर अन्य दोन मुलींचा शोध सध्या सुरु आहे. त्यांनी यावेळी या संदर्भात कबुली देतांना पोलिसांना धक्कदायक माहिती दिली.
कुठे सापडल्या मुली?
एक मुलगी उरणमधील चिरनेर येथील तिच्या गावात सापडली. दुसरी मुलगी मुंबईतील वांद्रे येथील रेल्वे पोलिसांना सापडली. तिच्यासोबत कोणीही नसल्याने तिला डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तर तिसरी मुलगी सातारा जिल्ह्यातील तिच्या मूळ गावी पोहोचल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. सातारा पोलिसांनी या मुलीला जवळच्या बालसुधारगृहात ठेवण्याची कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या संदर्भात पोलिस इतर दोन मुलींचा शोध घेत आहेत.
मुलींनी काय दिली माहिती?
बालसुधारगृहातून पळून गेलेल्या मुलींनी पोलिसांना सांगितले की, पनवेलमध्ये मुलींच्या अनाथाश्रमाची एक मजली इमारत आहे. मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे अनाथाश्रमात राहण्याची परवानगी नव्हती, म्हणून त्यांनी पळून जाण्याचा कट रचला.
कसे केले पलायन?
मुलीनी आधी सभागृहाच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल कापले, त्यांनतर त्या खिडकीबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढल्या. थोडे अंतर चालल्यानंतर, त्या शौचालयाच्या पाईपमधून जमिनीवरून खाली घसरत उतरल्या आणि पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.