नवी मुंबई/सावन वैश्य : लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघत असते. लाखो लोकांच्या वर्दळीत कोणत्याही प्रकारे घातपात होऊ नये यासाठी नवी मुंबईतील पोलीस सज्ज झाले आहेत. अनंत चतुर्दशीला बाप्पाला जड अंतकरणारने भाविक निरोप देतात. हाच बाप्पाचा निरोप सोहळा सुखकर व्हावा यासाठी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील तीनही परिमंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी या शुभ दिनी गणरायाचे आगमन झाले. अनेक घरात, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तसेच रहिवासी संकुलात बाप्पा विराजमान झाले आहेत. गेले दहा दिवस बाप्पांची मनोभावे अविरत सेवा करून, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी दिवशी बापाला निरोप देण्याचा दिवस आला आहे. बाप्पाच्या आगमनाने गेले दहा दिवस वातावरणात सकारत्मकताच जाणवत होती. रोजची सकाळ, संध्याकाळ होणारी बाप्पांची आरती, भजन, यामुळे भाविक भारवून गेले होते. मात्र आता जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. बाप्पाच्या या निरोप सोहळ्यासाठी नवी मुंबई पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. यासाठी आयुक्तालय हद्दीतील तीनही परिमंडळात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
परिमंडळ निहाय बंदोबस्त खालील प्रमाणे
परिमंडळ 1 अंतर्गत वाशी, एपीएमसी, कोपरखैरणे, रबाळे, रबाळे एमआयडीसी, तुर्भे, सानपाडा, या 7 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या बंदोबस्तात 1 पोलीस उपायुक्त, 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 20 पोलीस निरीक्षक, 95 सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, 578 पुरुष अंमलदार व 118 महिला अंमलदार तैनात असणार आहेत. तसेच प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत 1 असे एकूण 7 निर्भया पथक व 2 स्ट्राइकिंग देखील असणार आहेत.
परिमंडळ 2 अंतर्गत नेरूळ, सीबीडी बेलापूर, एनआरआय, उलवे, न्हावा शेवा, उरण व मोरा सागरी या 7 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. परिमंडळ 2 मध्ये 65 सार्वजनिक, 26 रहिवासी संकुलातील गणपती, तर 5 हजार 799 घरगुती गणपतीचा समावेश असणार आहे. परिमंडळ 2 मध्ये बंदोबस्तासाठी 1 पोलीस उपायुक्त, 2 सहाय्यक आयुक्त, 12 पोलीस निरीक्षक, 56 सहाय्यक व उपनिरीक्षक, 527 पोलीस अंमलदारांसह 2 स्ट्राइकिंग मोबाईल देखील असणार आहेत.
परिमंडळ 3 अंतर्गत 103 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, 87 रहिवासी संकुलातील गणपती व 10 हजार 422 घरगुती गणपतीचा समावेश आहे. परिमंडळ 3 मध्ये बंदोबस्तासाठी 1 पोलीस उपायुक्त, 2 सहाय्यक आयुक्त, 16 पोलीस निरीक्षक, 79 सहाय्यक व उपनिरीक्षक, तसेच 523 अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.