
Navi Mumbai mahila
नीता परब / मुंबई : युवतींचा व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्यविषयक जागरूकता, स्वसंरक्षण, उद्योजकता आणि भारतीय संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा परिचय या उद्देशाने विकासार्थ विद्यार्थी (स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट, युगंधरा आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित ‘युगंधरा युवती संमेलन २०२६’ शुक्रवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाले. नवी मुंबईतील या पहिल्या युवती संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल १,६५७ युवतींनी नोंदणी केली. (Navi Mumbai News)
संमेलनाचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी युवतींना मार्गदर्शन करताना सोशल मीडियावरील माहितीची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले. कोणतीही पोस्ट किंवा संदेश पुढे पाठवण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासणे आवश्यक असून, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या चुकीच्या माहितीपासून नागरिकांनी सावध राहावे, असे त्यांनी सांगितले. युवतींच्या व्यक्तिमत्त्व विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करत त्यांनी मुलींमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि सामाजिक जाणीव विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. सामाजिक सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी युवतींनी जागरूक नागरिक म्हणून सक्रिय योगदान द्यावे, असेही त्या म्हणाल्या.
चित्रपट अभिनेत्री कुंजिका कालविंत यांनी आपल्या मनोगतातून एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व विशद केले. सोशल मीडियावरील आभासी जग आणि प्रत्यक्ष जीवनातील वास्तव यांतील फरक ओळखणे आवश्यक असल्याचे सांगत युवतींनी केवळ आभासी लोकप्रियतेच्या मागे न लागता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुलांमध्ये योग्य संस्कार रुजविणे आणि त्यांना चांगले-वाईट यातील फरक समजावून सांगणे ही कुटुंबाची महत्त्वाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख कार्यकर्त्या अश्विनी भावे यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर मार्गदर्शन केले. कुटुंबव्यवस्था, सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांची कर्तव्ये यांचे महत्त्व स्पष्ट करत त्यांनी युवतींनी वैयक्तिक प्रगतीसोबतच समाजाच्या सकारात्मक परिवर्तनासाठीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
संमेलनात आयोजित पॅनल चर्चेत उद्योजिका निकिता भगवत, कायदेतज्ज्ञ अॅड. नीलम पवार आणि दुर्गावाहिनीच्या प्रांत संयोजिका मनिषा भोईर यांनी सहभाग घेतला. प्रांत कार्यसमिती सदस्या ऋतुजा भोर यांनी चर्चेचे समन्वयन केले. यावेळी युवतींसाठी उपलब्ध असलेल्या उद्योजकीय संधी, कायदेविषयक जागरूकता, व्यक्तिमत्त्व विकास, भारतीय संस्कृतीतील स्त्रीशक्तीचे स्थान आणि आध्यात्मिक मूल्ये या विषयांवर विचारमंथन करण्यात आले. इतिहासातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवतींनी स्वतःमधील क्षमता ओळखाव्यात आणि त्यांचा समाजहितासाठी उपयोग करावा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
हिरानंदानी रुग्णालय, वाशी येथील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ सल्लागार डॉ. हिना शेख यांनी पीसीओडी आणि पीसीओएस या विषयांवर मार्गदर्शन केले. या समस्यांची लक्षणे, आरोग्यदायी जीवनशैली आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. युवतींनी आरोग्यविषयक गैरसमजांवर विश्वास न ठेवता योग्य वैद्यकीय माहितीच्या आधारे निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
महारुद्र मर्दानी आखाडा, नवी मुंबई येथील युवतींनी सादर केलेली शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके संमेलनाचे विशेष आकर्षण ठरली. लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार आणि भाला यांसारख्या पारंपरिक शस्त्रांच्या साहाय्याने सादर केलेल्या प्रात्यक्षिकांतून शौर्य, शिस्त आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी युवतींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्याची आवश्यकता या सादरीकरणातून अधोरेखित झाली.
कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक सादरीकरण आणि ‘नारी तू नारायणी’ या संकल्पनेवर आधारित काव्यपठण असे विविध उपक्रम यावेळी पार पडले. राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात आला. वंदे मातरम्ने संमेलनाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर दशरथ भगत, राजीव गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, वाशीचे प्राचार्य डॉ. बासुकिनाथ एस. पांडे, सुरेश सिंह राणा, सीए धर्मेंद्र श्रीमाळ, सतीश निकम, स्वरूपजी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
युवतींचा सर्वांगीण विकास, आरोग्यविषयक जागरूकता, स्वसंरक्षण, सांस्कृतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधणारे हे संमेलन युवतींसाठी प्रेरणादायी व्यासपीठ ठरले. १,६५७ युवतींच्या नोंदणीमुळे या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद अधोरेखित झाला.