कोणीही उठतो अन् मला...; अजित पवार पर्यावरणप्रेमींवर संतापले
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी हजाराहून अधिक झाडे तोडण्याच्या प्रस्तावावरून पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त करत ही वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मात्र यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार चांगलेच चिडले. “कोणीही उठतो आणि मला उपदेश करतो. सगळा मक्ता मीच घेतला आहे. हे सगळं ऐकल्यावर कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो, असं वाटतं,” अशी भावना त्यांनी मिश्कील पण ठाम शब्दांत व्यक्त केली.
ही प्रतिक्रिया त्यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त चिंचवडमध्ये आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात दिली. उपस्थितांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि आसामचे पर्यावरण कार्यकर्ते जाधव पायांग यांचा समावेश होता.
“मक्ता मी घेतलाय, ह्यांनी फक्त उपदेश करायचा”
कार्यक्रमाच्या अखेरीस सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविषयी चिंता व्यक्त केली. “दुगडिवी टेकडी, एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. आपण पालकमंत्री म्हणून हस्तक्षेप करावा,” अशी विनंती त्यांनी केली. यावर उत्तर देताना पवार म्हणाले, “जो तो उठतो आणि मला उपदेश करतो. सगळा मक्ता मीच घेतलाय, ह्यांनी फक्त उपदेश द्यायचे. ठीक आहे, धन्यवाद.” या विधानावर सभागृहात हशा पिकला. वृक्षतोडीवर थेट भाष्य न करता त्यांनी विषय मोडीत काढला.
राज्यात ५ वर्षांत १०० कोटी झाडे लावणार – अजित पवार
सत्ता असलेल्या सरकारकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. “यंदा दहा कोटी झाडे राज्यात लावली जाणार आहेत. त्यापैकी एक कोटी बीड जिल्ह्यात. पुढील चार वर्षांत दरवर्षी २५ कोटी झाडांची लागवड करून पाच वर्षांत १०० कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच, “शासकीय कार्यक्रमात पुष्पगुच्छाऐवजी आता रोपे भेट दिली जातात. ही रोपे केवळ भेट म्हणून न ठेवता लावून जगवावीत. त्यासाठी लागणारी मदत राज्य सरकारकडून केली जाईल,” असेही ते म्हणाले.
“गडी अंगाने, उभानी आडवा…” – सयाजी शिंदेंसाठी गायलं गाणं!
कार्यक्रमात एक खास क्षण रंगला, जेव्हा अजित पवारांनी सयाजी शिंदेंच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करत मराठी चित्रपट पिंजरा मधील प्रसिद्ध गाणं – “गडी अंगाने, उभानी आडवा…” गायलं. “सयाजी शिंदे यांच्यात सह्याद्रीचा रांगडेपणा आहे. जे पोटात आहे, तेच ओठात – अस्सल सडेतोडपणा. माझ्याही स्वभावात तोच गुण असल्याने आमची वेव्ह लेंथ जुळते,” असेही पवार म्हणाले. यावेळी सागर कारंडे यांनी वाचलेलं आईचं पत्र ऐकून सयाजी शिंदे भावुक झाले. डोळ्यांत पाणी आलेल्या शिंदेंकडे पाहून संपूर्ण सभागृह काही क्षण स्तब्ध झालं.