'आता बाहेर बोलायचीही चोरी'; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटली असं का म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गेल्या काही दिवासांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांनदरम्यान दोन दिवासांपूर्वी त्यांनी आझाद मैदानावरील राजू शेट्टीच्या आंदोलनात, माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, असं विधान केलं होतं. त्याची चर्चाही राज्यभर जोरदार सुरू आहे. त्यावर आज स्वत: जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देत नाराजी व्यक्त केली आहे.
जंयत पाटील आज बारामतीत आहे. त्यांच्या नाराजीच्या चर्चेवर त्यांनी आज शरद पवारांचीही भेट घेतली. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रांची त्यांनी पाहणी केली. यावेळी पाटील यांनी नाराजीच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी नाराज वगैरे काही नाही. मला आता बाहेर बोलायची चोरी झाली आहे. मी भाषण केलेल्याचा रेफरन्स बघा. राजू शेट्टींना बोलताना मी आंदोलनाच्या अनुषंगाने विधान केले होते, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. राजू शेट्टी यांचा आमच्यावर विश्वास नाही, त्यांना आम्ही उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे माझं काही तुम्ही खरं धरू नका. तुम्ही तुमचे आंदोलन सुरू ठेवा, त्याला पाठिंबा आहे, अशी माझी भावना होती, असं ते म्हणाले.
शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी राजू शेट्टी यांनी आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. आझाद मैदानावरही त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या ठिकाणी जयंत पाटील दोन दिवासांपूर्वी गेले होते. त्यावेळी ते म्हणाले, यांनी जो झेंडा हाती घेतला तो कधी सोडलेला नाही. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मात्र ‘माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’. कारण काय तर तुम्हाला माझ्याबद्दल शंका असते. त्यामुळे तुम्हाला हमी देणं हे जरा धोक्याचं आहे. राजू शेट्टी आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण केलं असतं. ते झालेही असते खासदार, पण ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, ही खरी समस्या आहे, असं ते मिश्किलपणे म्हणाले होते.
काही दिवसांपर्वी जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली होती. बावनकुळेंच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट घेतली असून यावेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हदेखील उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर नंतर खुलासा केला होता.