रायगड जिल्हा राष्ट्रवादीची धुरा सुधाकर घारेंच्या हाती, शिंदेंच्या विरोधात सुनील तटकरेंची मोठी खेळी
कर्जत : राज्यात महायुतीत सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात रायगड जिल्ह्यात मात्र विस्तव जात नाही असे चित्र आहे. शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांना तोडीस तोड म्हणून, तरुण आणि आक्रमक अशी ओळख असलेल्या रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्हाध्यक्षदी नियुक्ती करुन, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे गटाला शह दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या रायकीय वर्तुळात रंगली आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटात वादाच्या ठिणग्या उडत असतात. याच वादामुळे मंत्री अदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली असली तरी पालकमंत्रीपदाचा वाद सुटलेला नाही. शिवसेनेचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, महाडचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे सातत्याने खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत असतात. मात्र ज्या ज्या वेळी तटकरे यांच्यावर टीका होते त्या त्या वेळी सुधाकर घारे शिंदे गटाच्या आमदारांना पुरुन उरतात. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तरुण आणि आक्रमक चेहरा देऊन खासदार सुनील तटकरे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे गटाला शह दिल्याचे मानले जात आहे.
सुधाकर घारे हे सुनील तटकरे यांच्या जवळचे मानले जातात. विधानसभा निवडणुकीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून घारे यांना तिकीट न मिळाल्याने त्यांच्यासह सर्वच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे राजीनामे सोपवून घारे यांनी अपक्ष निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत घारे यांनी थोरवे यांना मोठे आव्हान दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने घारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर करत पुन्हा पक्ष संघटनेत घेतले. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पातळीवरील राष्ट्रवादीच्या पक्षसंघटनेत अनेक फेरबदल देखील करण्यात आले. यातील महत्त्वाची बाब म्हणजे घारे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
सन २०२० ते २०२२ या काळात सुधाकर घारे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य शिक्षण आणि क्रिडा समितीचे सभापती होते. त्यामुळे जिल्ह्याच्या समाजकारणात आणि राजकारणाचा सुधाकर घारे यांना चांगला अनुभव असल्याचे देखील बोलले जाते. सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना जिल्ह्याच्या राजकारणात काम करण्याची त्यावेळी संधी दिली होती. आता पुन्हा एकदा पक्ष संघटनेच्या माध्यमातून घारे यांना जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय केले आहे.
सुधाकर घारे हे तरुण आणि आक्रमक म्हणून ओळखले जातात. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम कऱणारे, पक्षाच्या धेय्य धोरणानुसार काम करणारे म्हणून घारे यांची पक्ष संघटनेत ओळख आहे. तसेच घारे यांचा शहर आणि ग्रामीण भागात देखील चांगला लोकसंपर्क आहे. आदीवासी दुर्गम भागात घारे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पक्ष संघटनेच्या वाढीसाठी घारे यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवला असल्याचे बोलले जात आहे.