
बंगळूर-मुंबई दरम्यान मिरजमार्गे नवी सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार; प्रवाशांना होणार मोठा फायदा
इचलकरंजी : मागील कित्येक वर्षांपासून मागणी होत असलेल्या बंगळुरू-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसला अखेर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या रेल्वे संदर्भात नुकतीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी या एक्सप्रेस गाडीला रेल्वेमंत्र्यांनी हिरवा कंदील दर्शवला. यामुळे बेळगावहून मिरज-सांगलीमार्गे मुंबई आणि बंगळुरुसाठी आता आणखी एक सुपरफास्ट एक्स्प्रेस मिळणार आहे.
मागील ३० वर्षांपासून या दोन शहरांना जोडणारी उद्यान एक्स्प्रेस सोलापूर-गुंटकलमार्गे धावत आहे. आता या नव्या एक्स्प्रेसद्वारे बेळगाव, हुबळी, धारवाड, हावेरी, दावणगेरी हे जिल्हेही जोडले जाणार आहेत. शिवाय बेळगावमधून नवी एक्स्प्रेस मुंबईसाठी उपलब्ध होणार आहे. मिरज, सांगलीकरांनाही या निमित्ताने मुंबईसाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे.
सध्या मुंबईला जाणाऱ्या सर्वच एक्स्प्रेस गाड्या बाराही महिने हाउसफुल्ल असतात. या गाड्यांचे तिकीट मिळणे मुश्कील असते. सांगली, मिरजेसाठी या गाड्यांना मर्यादित कोटा असल्याचा फटका बसतो. बेंगलुरूमधून मुंबईसाठी मिरज-सांगलीमार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये मिरजेसाठी मोजकाच कोटा आहे. मात्र, नव्या सुपरफास्ट एक्स्प्रेसमुळे हा कोटा काही प्रमाणात वाढणार आहे. ही गाडी केव्हापासून धावणार आहे ? तिचे वेळापत्रक कसे असेल, याबातचा तपशील रेल्वेने अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र, डिसेंबर महिन्यात ही ट्रेन सुरू होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अनेक विकासकामांना सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अनेक विकासकामांना सुरुवात केली जात आहे. त्यातच भारतात ‘वंदे भारत’ रेल्वे पसंतीस उतरली आहे. अनेक मार्गांवर या गाड्या धावत आहेत. असे असताना काशीमधून चार ‘वंदे भारत’ गाड्या सुटणार आहेत. याला पंतप्रधान मोदी हे हिरवा झेंडा दाखवला.
हेदेखील वाचा : Indian Railways : भारतीय रेल्वेला खरंच आहे का काही भविष्य? वाढले गैरव्यवहार अन् दुर्घटना