होळी सणानंतर शेवटच्या सहाव्या आणि सातव्या दिवशी तळकोकणामध्ये मोठ्या प्रमाणात धूळवड साजरी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने गावागावात राधानृत्य साजरे केले जाते. यामध्ये भक्तीगीते, हिंदी – मराठी चित्रपटांच्या उडत्या गाण्यावर ठेका धरून राधा-कृष्ण, राक्षस, ब्राम्हण, मारुती ही पात्रे रंगविली जातात. यामध्ये प्रामुख्याने प्रौढ पुरुषांचा समावेश असतो. मात्र, आता शिमगोत्सवामध्ये सुद्धा नवीन ट्रेंड आलाय.
कोकणातील ही ऐतिहासिक परंपरा जपली जावी आणि नव्या पिढीला सुद्धा याची ओळख मिळावी म्हणून या राधानगृत्यांमध्ये चिमुकल्या बालगोपाळांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्गात होळीच्या सातव्या दिवशी रात्रभर रोंबाट, राधानृत्याद्वारे मनोरंजन केले जाते. आजची तरुण पिढी मोबाईल आणि कॉम्पुटर युगात सक्रिय असताना तिला आपल्या रूढी – परंपरा लक्षात राहणे गरजेचे असते. त्यामुळे सध्या कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील बालगोपाळांची राधा चर्चेचा विषय बनली आहे.