मुंबई: येवला हे पैठणीचे (Paithani) माहेरघर आहे. मात्र कोरोना काळात याच माहेरवाशिणीला मदत मिळणे मुश्कील झाले होते. त्याचा परिणाम येवल्यातील विणकरांच्या व्यापारावरच नव्हे तर उपजीविकेवर झाला. वर्षानुवर्षे उत्पादन केंद्र असलेल्या येवला शहराचा व्यापार ठप्प झाला. त्यामुळे अस्सल पैठणी साडी ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी दोन वर्षांच्या कालावधीनंतर ‘न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हल’ (New Wave Paithani Festival) आणि ‘न्यू वेव्ह पैठणी बीस्पोक’ (New Wave Paithani Bespoke) ला आजपासून सुरुवात झाली. अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev), दिग्दर्शक शंतनू रोडे आणि फेस्टिव्हलच्या दिग्दर्शका सन्निधा भिडे यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात उद्धाटन झाले.
यावेळी सायली संजीव म्हणाली “पैठणी तर मला आधीपासूनच आवडायची परंतु माझ्या येणाऱ्या नवीन सिनेमामुळे मी तिच्या अजून नव्याने प्रेमात पडले. इथे असलेली कोणतीही पैठणी बघा त्यात किती वेगळ्या नक्षी असूदेत ती तुम्हाला प्रेमात पाडतेच. या फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या राज्यातील साड्या आहेत त्यात त्यांचं स्वतःच वैशिष्ट्य आहे. सर्वात महत्वाच म्हणजे इथे सगळ्या राज्यातील कारागिरांना संधी दिली जाते. मी आवर्जून सांगते की न्यू वेव्ह पैठणी फेस्टिव्हलला नक्की भेट द्या”.
न्यू वेव्ह पैठणी च्या डायरेक्टर सन्निधा भिडे म्हणतात, “कोविड १९चा प्रादुर्भाव झाल्यापासून हातमाग विणकरांना मोठ्या प्रमाणावर कामाचे नुकसान झाले आणि बहुतेक विणकरांना त्यांचे काम बदलावे लागल्या मुळे येवला विभागातील अस्सल पैठणी साडीच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. या सणासुदीच्या हंगामात आम्ही पुन्हा वार्षिक बाजाराची परंपरा पुढे चालू ठेवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. यावर्षी, येवला विणकरांच्या मदतीने आम्ही विणकर कुटुंबांना ‘न्यू वेव्ह पैठणी बीस्पोक’ ची संकल्पना मांडत आहेत. जी वर्षभर लाभ देणारी असेल. जेणेकरून ग्राहकांना आता कस्टमाइज पैठणी साड्यांची निवड करता येईल. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार रंग ,नक्षीकाम, इतर सगळ्याची निवड करून फेस्टिवल दरम्यान मागणी नोंदवता येईल. ग्राहकांना १५० वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या पाहायला मिळतील. या सगळ्या पैठण्या अस्सल दर्जाच्या असून त्यांची किंमत १५००० हजार पासून ते ३.५ लाखपर्यंत असणार आहे. ”
यावर्षी लग्नसराई, दिवाळी, नवीन ट्रेंड या सगळ्या गोष्ठी लक्ष्यात ठेवून ‘न्यू वेव्ह शॉपिंग फेस्टिव्हल’ अंतर्गत देशभरातील ४० विविध विणकरांना एकत्र घेऊन चंदेरी, माहेश्वरी, जामदनी, बनारसी, कांथा, कोसा, साउथ सिल्क, राजस्थानमधील रिअल कोटा डोरिया साड्या, पश्चिम बंगालमधील बलूचारी साड्या यासारख्या विविध हातमागावरील साड्या उपलब्ध असून राजस्थानी रजया, काश्मीरमधील रिअल पश्मिना शॉल्स , साऊथचे दागिने आणि बरेच काही. पैठणी जॅकेट, पुणेरी पगडी, आकाशकंदील, मोजडी अशा पैठणी मटेरिअलपासून बनवलेल्या अनेक वैविध्यपूर्ण वस्तू प्रदर्शित करण्यात येणार आहेत. डिझायनर साड्या आणि ब्लाउज, ऑरगॅनिक सौंदर्य प्रसाधने आहेत. लक्ष्य आर्ट फाऊंडेशन आणि आधार सारख्या एनजीओना त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी मोफत स्टॉलसुद्धा बघायला मिळतील.