विजय शिवतारेंनी फुंकले नगरपालिकेचे रणशिंग; म्हणाले, आता सहा महिन्यात...
सासवड : सहा महिन्याच्या आतमध्ये राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका होत असून, आता आपले लक्ष नगरपालीकेच्या निवडणुकीकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सासवड नगरपालिका ताब्यात घेणारचं. यासाठी तळागाळातील, सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल. त्यांना पूर्ण ताकद देण्यात येईल आणि नगरपालिकेवर भगवा फडकाविला जाईल, अशा शब्दात पुरंदरचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचा शनिवार निकाल जाहीर होऊन विजय शिवतारे यांनी आमदार संजय जगताप यांच्यावर २ हजार १८८ मतांनी विजय मिळविला. त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जंगी विजयी मिरवणूक काढली. नगरपालिका येथील शिवतीर्थावर मिरवणूक आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यासाठी गेले असता तेथील मशीन बंद असल्याने हार घालता आली नाही. त्यावर शिवतारे यांनी संताप व्यक्त करतानाच आज काही बोलणार नाही मात्र येत्या सहा महिन्यात थेट नगरपालिकाच ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे.
यापूर्वी मी एकटा होतो त्यामुळे कमी पडत होतो आता तीन मोठे नेते माझ्यासोबत आहेत, कोणाचाही मान अपमान होणार नाही, असे सांगून माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे अभिनंदन केले. निलेश जगताप यांच्यासारखा प्रामाणिक माणूस कधी पहिला नाही. अशा शब्दात भाजपचे पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश जगताप यांचे आभार मानले आहेत. मी दिवसरात्र प्रचारात असताना कार्यकर्त्यांचे उत्तम नियोजन डॉ. ममता शिवतारे यांनी केल्याचे सांगून कन्या ममता यांचे जाहीर आभार मानले.
हे सुद्धा वाचा : आम्ही नगरसेवक कधी होणार? कार्यकर्त्यांचा सवाल; अडीच वर्षे प्रशासकीय राज
मी तुमच्यासाठी सदैव हजर : शिवतारे
कार्यकर्त्यांनी प्रचंड, मेहनत घेतल्यानेच माझा विजय झाला आहे. त्यामुळे मी तुमच्यासाठी सदैव हजर आहे. रात्री अपरात्री कधीही फोन करा, माझे फोन कधीही पीएकडे नसतात असे सांगून माजी आमदार संजय जगताप यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. आगामी काळात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका येत असून, यामध्ये सामान्य फाटक्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल आणि महायुतीची सत्ता तालुक्यात आणली जाईल, अशा शब्दात शिवतारे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.
लवकरचं निवडणुका होणार
राज्यात विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला अक्षरशः लोळवले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला जेमतेम 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. महायुतीला मिळालेला हा अनपेक्षित अंदाज पाहून महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत लोकांचा मिळालेला प्रतिसाद बघता, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.