
चार दिवसांपूर्वी भेटलो होतो, आज मला...; अजित पवारांच्या आठवणींने निशिकांत भोसले पाटलांना अश्रू अनावर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उरुण–ईश्वरपूर येथे सर्वपक्षीय, सामाजिक संघटना, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली.
निशिकांत भोसले–पाटील म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक घटकाला आपला वाटणारा नेता म्हणजे अजितदादा. कार्यकर्त्यांपासून सामान्य जनतेपर्यंत प्रत्येकासाठी ते आधार होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.”
उरुण–ईश्वरपूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मुलगुंडे म्हणाले, “अजितदादा शब्दाला पक्के असणारे नेते होते. दिलेला शब्द पाळताना त्यांनी कधीही भविष्यातील राजकारणाचा विचार केला नाही. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळ देणारा हा नेता राज्याच्या विकासाचा मजबूत आधार होता.”
शिवसेना नेते गौरव नायकवडी म्हणाले, “शाहू–फुले–आंबेडकरांचा विचार जपणारे, कामाला प्राधान्य देणारे नेते म्हणून अजितदादांची ओळख होती. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळखत होता.”
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील म्हणाले, “अजितदादा हे अत्यंत स्पष्टवक्ते होते. असा स्पष्टवक्ता नेता पुन्हा होणे कठीण आहे. महाराष्ट्र त्यांच्या निर्णयांकडे आशेने पाहायचा.”
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सहसचिव विश्वनाथ डांगे म्हणाले, “प्रशासनाचा गाढा अभ्यास असणारे अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारण व विकास चळवळीतील एक महत्त्वाचा स्तंभ होते.”
वाळवा शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. धैर्यशील पाटील म्हणाले, “जनसामान्यांशी नाळ असलेले, सर्व क्षेत्रांचा सखोल अभ्यास असलेले नेते म्हणजे अजितदादा. संकटाच्या काळात त्यांनी राज्याला धाडसी व योग्य निर्णयांनी दिशा दिली.”
माजी आमदार भगवान सांळुखे म्हणाले, “अजितदादांनी शिक्षण क्षेत्राला विशेष महत्त्व दिले. शिक्षण विकासासाठी घेतलेले त्यांचे निर्णय दूरगामी ठरले.”
उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव म्हणाले, “निर्णयक्षमता व कामातून ओळख निर्माण करणारे नेते म्हणजे अजितदादा.”
राष्ट्रीय काँग्रेसचे नंदकुमार कुंभार व शाकीर तांबोळी म्हणाले, “अजितदादांनी कधीही जात–पात केली नाही. ते सर्वसमावेशक नेतृत्व होते. अल्पसंख्याक समाजाच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे.”
भाजपाचे विक्रम पाटील म्हणाले, “शहराच्या विकासात अजितदादांचे योगदान कायम स्मरणात राहील.” बी. जी. पाटील म्हणाले, “बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले दादा म्हणजे महाराष्ट्राचा राजहंस होता. रागडा पण प्रामाणिक नेता आपल्यातून गेला.”
कॉम्रेड धनाजी गुरव म्हणाले, “राजकारणापलीकडे जाऊन चळवळ उभी करणाऱ्यांच्या पाठीशी अजितदादा नेहमी ठाम उभे राहिले.”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील म्हणाले, “कर्तबगार, कणखर नेता शेवटपर्यंत लोकांसाठी जगला; पण तो खूप लवकर आपल्यातून निघून गेला. हे महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सयाजी मोरे म्हणाले, “चांद्यापासून बांद्यापर्यंतचा महाराष्ट्र आज हळहळतो आहे.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे राजेंद्र शिंदे, माजी नगराध्यक्षा प्रा. अरुणादेवी पाटील, नगरसेवक सुभाष सूर्यवंशी, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वास पाटील, नगरसेवक एल. एन. शहा, शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. आर. पाटील, नंदकुमार नांगरे, ॲड. अमित वेटम, डॉ. अमित सूर्यवंशी, नगरसेविका पुष्पलता खरात, फिरोज पटेल, प्रणव जाधव, विक्रम शिंदे, अर्जुन पाटील, अभिजीत शिंदे, स्वप्नील टिबे, मानसिंग पाटील, दादासाहेब पाटील, संभाजी ब्रिगेडचे उमेश शेवाळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा तैसिन आत्तार, कमलताई पाटील, उषाताई पंडित, भाजपाच्या ज्ञानेश्वरी देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
“कार्यकर्त्यांचा आधार हरपला…”
श्रद्धांजली वाहताना निशिकांत भोसले–पाटील यांनी चार दिवसांपूर्वी अजितदादांसोबत झालेल्या प्रत्यक्ष संवादाची आठवण सांगितली. “कार्यकर्त्याची काळजी घेणारा, त्याला आधार व बळ देणारा नेता म्हणजे अजितदादा,” असे सांगताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.