मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत असताना जरांगे पाटील यांनी फडणवीस जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळजनक उडाली असून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक भाजप नेत्यांनी टीकास्त्र डागले असून नितेश राणे यांनी देखील जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्यावर राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असल्याचे देखील नितेश राणे म्हणाले आहेत.
मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यावर आरोप केले आहेत. नितेश राणे म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठा आरक्षणासाठी आहे की, देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी? त्यांनी हा लढा कशासाठी सुरू केला होता? मनोज जरांगे जी स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत, ती नेमकी कुणाची आहे? कारण आम्हाला या स्क्रिप्टमधून तुतारीचा वास यायला लागला आहे. हा लढा मराठा समाजाचा असेल तर तो मराठा समाजापर्यंत मर्यादीत ठेवावा. जर त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप करण्याचं राजकारण केलं आणि खालच्या पातळीवर येऊन टीका केली. तर सागर बंगल्याची भिंतही त्यांना ओलांडता येणार नाही”, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. तसेच शरद पवार यांच्यावर त्यांचे प्रत्यक्ष नाव न घेता संशय व्यक्त केला आहे.
पुढे आमदार राणे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. त्यामुळेच मराठा समाजानेही फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांचं समाधान होत नसेल आणि म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतील तर आम्हीही मराठेच आहोत. त्यांना तोंड देण्यासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत.” असे प्रत्युत्तर नितेश राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे.