नागपुरात 6 महिन्यांसाठी ट्रॅव्हल्सला 'नो एन्ट्री'; जाणून घ्या निर्णय नेमका काय?
शहरात वाहतुकीचा प्रश्न बिकट बनत आहे. त्यातच शहरातील ट्रॅव्हल बसेसच्या मनमानी कारभारावर पुन्हा एकदा लगाम लावण्याचा प्रयत्न वाहतूक उपायुक्त लोहित मतानी यांनी केला असून, मर्यादित प्रवेशाच्या निर्णयाला १२ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या आदेशानुसार, सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत ट्रॅव्हल बसेसना शहराच्या अंतर्गत रिंगरोडवर प्रवासी घेण्यासाठी किंवा उतरवण्यासाठी थांबता येणार नाही.
१२ मार्चनंतर शहरातील अंतर्गत मार्गांवर ट्रॅव्हल बसेस थांबणे बंद झाल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा दिसून आली. प्रमुख चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला असून, या निर्णयाचे शहरवासियांनी स्वागत केले. त्यामुळे वाहतूक उपायुक्तांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत ही अधिसूचना जारी करून निर्णयाला सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली.
दरम्यान, काही बस चालकांनी सुरुवातीला या आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर दंड आकारण्यास सुरुवात केली आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत गुन्हे दाखल केले. या कारवाईमुळे बस चालकांना आदेशाचे पालन करणे भाग पडले.
काही श्रेणींना नियमांमधून सूट
या नियमांमधून काही श्रेणींना सूट देण्यात आली आहे. ज्यात मिहान, एमआयडीसी कॉम्प्लेक्समधील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी धावणाऱ्या स्टाफ बसेस, एसटी महामंडळाच्या बसेसचा समावेश आहे. तसेच रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा, आणि शालेय बसेस, विवाह किंवा इतर कार्यक्रमांसाठी नागपूरला येणाऱ्या किंवा जाणाऱ्या बसेस. ज्येष्ठ नागरिक देखील शहरात थांबता येईल आणि महिलांसाठी विशेष देवदर्शनासाठी धावणाऱ्या बसेस देखील शहरात थांबतात.
कोणत्या मार्गांवर परिणाम ?
नागपूरमधून वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, पुणे, नाशिक, छिंदवाडा, जबलपूर, भोपाळ, इंदूर, भंडारा, गोंदिया, छत्तीसगड, ब्रह्मपुरी, वडसा, गडचिरोली या मार्गावरून ये-जा करणाऱ्या सुमारे २००० हून अधिक बसेसना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
हा निर्णय का आवश्यक?
नागपुरात सुमारे २० लाख दुचाकी आणि ५ लाख चारचाकी वाहने आहेत. वाहतूक कोंडीमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण वाढत आहे. अशा परिस्थितीत, प्रवाशी बसेसच्या बेकायदेशीर थांब्यामुळे सामान्य नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या निर्णयामुळे सीए रोड, जाधव चौक, बैद्यनाथ चौक, व्हरायटी चौक, कॉटन मार्केट, गीतांजली चौक, स्नेहनगर बस स्टॉप, वर्धा रोड, रहाटे कॉलनी चौक, मानस चौक, भोळे पेट्रोलपंप, सक्करदरा चौक, दिघोरी चौक, छत्रपती चौक यांसारख्या अनेक बेकायदेशीर पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट्सवर नियंत्रण येणार आहे.