जिल्ह्यात पावसाची संततधार कायम
भंडारा : जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला होता. या अलर्टनुसार अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रे व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी विशेषाधिकार वापरून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना एक दिवसाची सुटी दिली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे पावसाने हजेरी लावली नाही, उलट तो गायबच झाला.
दिवसभरात केवळ रिमझिम स्वरूपातच पाऊस पडल्याने, नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांना एक विलक्षण अनुभव घेऊन घरीच बसून आला. याआधी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, हवामानातील संभाव्य घडामोडी लक्षात घेता तो रेड अलर्टमध्ये रूपांतरित करण्यात आला. रेड अलर्ट म्हणजे अतिवृष्टीची शक्यता, मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता.
पवनी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये एकूण सरासरी 475.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद सरासरीच्या तुलनेत 124.3 टक्के इतकी आहे. पवनी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. तालुकानिहाय आकडेवारी भंडारा 452.1 मिमी (116.0%), मोहाडी 384.0 मिमी, (110.4%), तुमसर 378.3 मिमी (103.6%), पवनी 506.6 मिमी (140.4%), साकोली 526.6 मिमी (126.7%), लाखांदूर 610.5 मिमी (153.9%), लाखनी 548.5 मिमी (140.2%) अशी आहे. या आकडेवारीवरून काही तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. तरीही असमान वितरणामुळे काही भागांत अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे.
गोसेखुर्दच्या 33 दरवाजातून विसर्ग
जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला नसला, तरी इतर भागातील प्रकल्पांमधून आहे. शनिवारी दुपारी येणाऱ्या जलस्तरामुळे गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 23 दरवाजांतून 2603.99 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. सायंकाळपर्यंत सर्व 33 दरवाजे उघडून विसर्ग वाढवून 3662.94 क्युसेक करण्यात आला. परंतु, प्रत्यक्षात पावसानेच दांडी मारल्यामुळे रेड अलर्ट फोल ठरला. यामुळे हवामान अंदाजाच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.
25 जुलैच्या रेड अलर्टनंतर, पुढील 2 दिवसांसाठी हवामान खात्याने अनुक्रमे ऑरेंज आणि यलो अलर्ट जाहीर केले आहेत. ऑरेंज अलर्टमुळे मुसळधार पावसाची शक्यता कायम असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.