बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये होणार आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारत हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज भरताना तिथे देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) देखील उपस्थित होते. बारामतीला कोणीच थांबवू शकत नाही. सुनेत्रा वहिनींनादेखील कोणी थांबवू शकत नाही. बारामतीमध्ये इतिहास घडणार आहे. आपल्या सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी तिथे कांचन कूल पासून ते नवनाथ पडळकरदेखील उपस्थित होते.
देशाचा नेता निवडण्याची लढाई
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील २५ वर्षं अजित पवार यांनी बारामतीचा विकास केला. त्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. आज बारामतीचे जे रूप आहे हे अजित पवार यांच्यामुळे आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. आगामी लोकसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढाई नाही तर ही लढाई देशाचा नेता निवडण्याची लढाई आहे. देशाचा नेता कोण होईल आणि कोणाच्या हाती देश देऊ, हे ठरवणारी ही निवडणूक आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बारामतीचा खासदार हा मोदींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो, हे निवडणुकीमध्ये पाहणं महत्वाचे ठरणार आहे. घड्याळ, धनुष्णबाण किंवा कमळ कोणालाही मत द्या. मत मोदींना जाईल किंवा राहुल गांधींना जाईल. त्यामुळे मत कोणाला द्याच आहे हे हा सर्वस्वी निर्णय बारामतीकरांचा असणार आहे. विकासाला मत द्यायचं की विनाशाला मत द्यायचं, हा निर्णय आता तुमचा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तरुणांसाठी मोठी मदत
नरेंद्र मोदी यांनी केलेली १० वर्षांतील विकास काम आपण पहिली आहेत. २० कोटी जनतेला मोदींनी झोपडीमधून पक्क्या घरामध्ये आणलं. तरुणांसाठी मोठी मदत केली आहे. त्यांनी महिलांना देखील मोठी मदत केली आहे. देशात मोठे उद्योजक तयार करण्यासाठी मोदी प्रयत्नशील आहेत. बाराबलुतेदारांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत,असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, मागील १० वर्ष हे फक्त ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है, पुढच्या पाच वर्षात बदललेला भारत आपण पाहिला आहे.