
Baramati By-Poll 2026, Sunetra Pawar Nomination, Ajit Pawar Successor,
दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी अवघ्या चार दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर महत्त्वाचा आढावा, दौरा आणि बैठका देखील सुनेत्रा पवार यांनी घेतल्या. त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील सुनेत्रा पवार सहभागी झाल्या होत्या. यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा पक्ष मजबूतीकडे वळवला आहे. सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच पक्षाची आढावा बैठक घेणार आहेत. मुंबईमध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. पक्षांतर्गत शिस्त, निर्णय आणि आगामी काळातील रणनीती यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.
हे देखील वाचा : “तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन…; ACB ने लिपीकाला रंगेहात पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया
त्याचबरोबर या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे देखील या राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नरहरी झिरवळ हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. मंत्रिमंडळातील त्यांच्या दालनामध्ये लाचखोरीचे प्रकरणावरील कारवाईमुळे झिरवळ यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधकांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सुनेत्रा पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये नरहरी झिरवळ सहभागी होणार आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार या प्रकरणी त्यांची मते जाणून घेणार आहेत.
हे देखील वाचा : कॉंग्रेस अध्यक्षांची छत्रपती शिवाजी महाराजांची टीपू सुलतानसोबत तुलना; नितेश राणेंनी दिला कडक इशारा
नरहरी झिरवळ यांना सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर कमिटीसमोर त्यांची भूमिका मांडावी लागणार आहे. विशेष म्हणजे शनिवार सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉट रिचेबल होते, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. आता ते पक्षासमोर आपली भूमिका मांडणार आहेत. त्याचबरोबर पक्षाच्या अंतर्गत संरचनेतही मोठे फेरबदल होण्याचे संकेत या बैठकीतून मिळत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या बैठकीत नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कधी आणि कुठे घ्यायची, याची तारीख आज निश्चित केली जाऊ शकते. येत्या दोन आठवड्यांत ही संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.