
ऊस दरवाढीवर तोडगा नाहीच ! सोलापुरात कडाक्याच्या थंडीतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्काम, रस्त्यावरच मांडल्या चुली
सोलापूर : ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये पहिली उचल मिळावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते, माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १६) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला. दुपारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले असून, कडाक्याच्या थंडीतही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठाण मांडले आहे. रात्री उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावरच चुली मांडून भोजन शिजवले आणि मुक्काम ठोकला.
सोमवारी सकाळी चार हुतात्मा पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली. पार्क चौक, जिल्हा परिषद, रंगभवन, सात रस्ता मार्गे हा मोर्चा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. दुपारी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते व साखर कारखानदारांची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत ऊस दराबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे राजू शेट्टी, महादेव जानकर आणि हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर व सोलापूर-विजयपूर महामार्गावरच ठिय्या मांडला.
मोबाईल टॉर्चच्या उजेडात रात्र जागवली
दिवसभर कडक उन्हात उपाशीपोटी बसलेल्या शेतकऱ्यांनी रात्री कडाक्याच्या थंडीतही माघार घेतली नाही. रात्रीच्या वेळी महानगरपालिकेने परिसरातील पथदिवे बंद ठेवल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. या अंधारात शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलच्या बॅटऱ्या सुरू करून परिसर उजळून काढला आणि घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. सायंकाळी शेतकऱ्यांनी सोलापूर-विजयपूर मार्गावरच दगडांच्या चुली मांडून भाकरी-भाजी शिजवली. जोपर्यंत पहिली उचल ३५०० रुपये जाहीर होत नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही, असा इशारा राजू शेट्टी व महादेव जानकर यांनी दिला आहे.
इतर जिल्ह्यांप्रमाणे दर का नाही? शेट्टींचा सवाल
यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर जोरदार निशाणा साधला. “कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने ४२०० रुपये, कर्नाटकमधील कारखाने ३६०० रुपये, तर सातारा आणि पुणे भागात ३५०० रुपये दर देत आहेत. मग सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने ३००० ते ३१०० रुपयेच दर का देत आहेत?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये, गाळप संपल्यावर १०० रुपये आणि साखरेचे दर वर्षभर ४५ रुपयांच्या पुढे राहिल्यास पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी २०० रुपये असे एकूण ३८०० रुपये प्रतिटन मिळावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच चार हुतात्मा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीतम यावलकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि १५० हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचताच पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वार बंद केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाकडे धाव घेतल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
सोलापूर-विजयपूर मार्गावरील वाहतूक बंद
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ऊस दरासाठी आंदोलन सुरू झाले आहे. आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे सोलापूर-विजयपूर मार्गावरील शासकीय विश्रामगृह ते पत्रकार भवन चौकापर्यंतची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे.
नेते डीसीसी बँक निवडणुकीत मग्न
सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते या निवडणुकीच्या जोडण्यांमध्ये मग्न आहेत. एकीकडे शेतकरी आपल्या हक्काच्या ऊस दरासाठी थंडीत रस्त्यावर उतरला असताना, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कारखानदार मात्र बँकेच्या राजकारणात व्यस्त असल्याचा तीव्र आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी यावेळी केला.
FAQ
1. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी काय आहे?
ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये पहिली उचल मिळावी, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
2. सोलापुरातील आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
3. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर किती शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला?
दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला.