बार्शी: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन प्रांतांना जोडणारे बार्शी गाव सर्व सुख सोयीने सज्ज झाले पाहिजे, त्यासाठी आपण आमदार राजेंद्र राऊत यांच्या मागणीप्रमाणे कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
बार्शी येथील उद्योजक दिलीप गांधी यांच्या सोयाबीन प्रकल्पाचे उद्घाटन, पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे व भुयारी गटार योजनेचे लोकार्पण कार्यक्रमासाठी व सत्कार स्वीकारण्यासाठी बार्शीत आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा चांदीची गदा देऊन आमदार राजेंद्र राऊत यांनी सत्कार केला.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बार्शी शहर व तालुक्याने व्यापारपेठेसह आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. तसेच सिंचन क्षेत्रातही यापुढे आपण भरघोस निधी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. १९९६ पासून रखडलेल्या बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी ७५० कोटी रुपयांची मंजुरीही नुकतीच दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या कामासाठीची निविदा जाहीर केली जाणार आहे. या सिंचन योजनेमुळे अवर्षण प्रवण असलेल्या बार्शी तालुक्यातील बारा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे खूप नुकसान सोसावे लागले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांनाही अवघ्या तीनच महिन्यांमध्ये नुकसान भरपाई म्हणून ७ हजार कोटींचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या सरकारने केले आहेत. उजनी पाणीपुरवठ्यासाठीही राज्य सरकारच्या ‘ अमृत २’ या योजनेमध्ये बार्शी शहराचा पाणीपुरवठा योजनेचा समावेश करण्यात येणार असून त्यासाठीचा निधी लवकरच वितरित करू असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
ते म्हणाले, शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा व्हावा यासाठी सरकार लवकरच मुख्यमंत्री सौर योजनेच्या माध्यमातून सर्वत्र सोलर फिडर यंत्रणा राबविण्यात येणार आहे. त्यासाठी एकरी ७५ हजार रुपये भाडे शेतकऱ्यांसाठी दिले जाणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना बारा तास वीजपुरवठा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारून त्यांची शेती त्यांच्याच मालकीची राहणार असल्याचे स्पष्टीकरण ही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी बार्शी शहरातील भुयारी गटार योजना आणि पंतप्रधान आवास योजनेतील कामे उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठीवर फडणवीस यांनी कौतुकाची थाप मारली.
यावेळी आमदार राऊत म्हणाले, बार्शीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्याप्रमाणे शहरातील तेरा रस्त्यांसाठी ८९ कोटी, बार्शी सोलापूर रस्त्यासाठी ११२ कोटी रुपये दिले त्याच पद्धतीने आपण यापुढेही बार्शीच्या विकासासाठी आम्हाला भरघोस निधी द्या, आणि विशेष लक्ष असू द्या, अशी मागणी आपल्या भाषणात त्यांनी केली. यावेळी बार्शी शहराच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांदीची गदा देऊन सत्कार केला.
कार्यक्रमास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर महाराज स्वामी, माजी मंत्री सुभाष देशमुख, विजय देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार सुरेश धस, आमदार रणजितसिंह मोहिते, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे, यांच्यासह भाजपचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.