भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसी समाज आक्रमक; अजित पवारांना दिला गंभीर इशारा
पुणे : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या शपथविधीत ओबीसी नेते छगन भुजबळ यांना स्थान न देऊन त्यांच्यावर आणि पर्यायाने ओबीसी समाजावर केलेल्या अन्यायाविरोधात सकल ओबीसी समाज पुणे आणि पिंपरी चिंचवडतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर “जोडे मारो निषेध आंदोलन” करण्यात आले.
यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा निषेध करण्यासाठी ओबीसी कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचा पाेषाख परीधान केला हाेता. यावेळी समता परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, समता परिषदेचे पुणे शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, समता परिषदेच्या सल्लागार सपना माळी, ॲड. मंगेश ससाणे, वैष्णवी सातव, प्रभु महाराज माळी आदी कार्यकर्त्यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छगन भुजबळ यांची ज्येष्ठता आणि त्यांच्यामागे उभी आसलेली ओबीसी समाजाची ताकद पाहता भुजबळ यांना मंत्रीमंडळात सन्मानाने स्थान द्यावे. यासाठी ओबीसी समाज पेटून उठला असून, संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे करेल असा, इशारा यावेळी देण्यात आला.
हे सुद्धा वाचा : आळंदी हादरली! पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल ६६ जणांचा घेतला चावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी
भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न देऊन सरकारने मोठा अन्याय केला असून, सरकारने आणि खास करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. येत्या दोन दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज मतांमधून आपला असंतोष व्यक्त करेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला असून महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले. महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्कातंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याचे समोर आले आहे मंगळवारी, भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. त्यानंतर आज भुजबळ आपली भूमिका जाहीर घेणार आहेत.