
कुत्रा चावल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; संपर्कातील 40 जणांमध्ये भीतीचे वातावरण
अक्कलकोट : व्हसूर येथे कुत्र्याने चावा घेतल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. भिमराया मडी (वय ७०) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. यामध्ये त्याच्या संपर्कातील ४० जण चांगलेच घाबरले आहेत.
व्हसूर येथील भिमराया मडी यांना गावातील कुत्रा चावला. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. जास्त त्रास झाल्याने त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. या मृत्यूची माहिती समजल्यावर व्हसूर गावात एकच खळबळ उडाली. त्यांचा मृतदेह व्हसूर गावी रविवारी सकाळी अंत्यविधीसाठी आणण्यात आला होता. त्यांच्या संपर्कात असलेले ४० जण हादरले. यात २० महिन्यांचे बालक आणि एका गर्भवती महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, ही मंडळी तातडीने उपचार घेण्यासाठी नागणसूर येथील आरोग्य केंद्रात गेली. मात्र, तेथे कोणीही दखल घेतली नाही. त्यांनी ही घटना जिल्हा शिवसेना उपप्रमुख सुनील कटारे यांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीने या सर्व ४० जणांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात बोलावले.
शिवसेना आरोग्य विभागाचे प्रमुख बसवराज अल्लोळी हेही मदतीला धावले. जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे यांनी ही घटना तालुका वैद्यकीय अधिकारी अर्जुन करजखेडे यांच्या कानावर घातली. ग्रामीण रुग्णालयात अगोदरच सर्दी-ताप, खोकला यांची रूग्णसंख्या खूप मोठी होती. तरी देखील घटनेचे गांभीर्य पाहून वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल क्षीरसागर, आरोग्यसेविका फुलसुंदर, तौफिक शेख यांनी सर्व ४० जणांना तातडीने टीटी आणि संसर्ग प्रतिबंधक इंजेक्शन दिले.
कुत्रा चालवल्याने एका तरुणाचा मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, गाझियाबादच्या विजयनगर येथील चरणसिंग कॉलनीत राहणार्या १४ वर्षीय तरुणाचा रेबीज संसर्गामुळे मृत्यू झाला. दीड महिन्यापूर्वी मुलाला शेजारच्या कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र, भीतीपोटी त्याने घरच्यांना काही सांगितले नाही. रेबीजच्या संसर्गामुळे मुलाची प्रकृती ढासळू लागली तेव्हा कुटुंबियांना समजले. त्यांनी मुलाला लगेच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार करुन परतत असताना मुलाचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाला.