नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात (Onion Export) शुल्क लावल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी आक्रमक झाले असून, कांद्याचा बेमुदत लिलाव बंदचा आजचा तिसरा दिवस आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव दोन दिवसांपासून ठप्प आहेत. यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही मोठं नुकसान सोसावं लागतंय. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी बैठक बोलावली आहे.
कांदा प्रश्नावर शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी, नाफेड आणि सरकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक सुरू आहे. मंगळवारी देखील नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. मात्र, त्यातून कुठलाही तोडगा निघाला नाही. केंद्र सरकारने निर्यात शुल्क मागे घेऊन कांद्याला किमान 4 हजार रुपयांचा हमीभाव मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने केली. शिंदे टोल नाक्यावर आंदोलन करत असताना या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.
सरकारच्या याच निर्णयाच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने नाशिकच्या शिंदे टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. कांद्याला चांगला हमीभाव द्यावा, त्याचप्रकारे शेतकऱ्यांचं विज बिल माफ करावे, टोमॅटो आयात बंद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून करण्यात आली.