वरवंड : दौड तालुक्यात ऊस आणि कांदा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात.कधी काळी सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या;कांदा पिकाला दर मिळत नसल्याने आता चक्क शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. यामुळे शेतकरी कांदा पिकांचा शेतातच अंतविधी घालून त्यावर चक्क नांगर फिरवत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पहावयास मिळत आहे.
शेतीमध्ये आर्थिक उत्पन्न मिळावे हि सर्वच शेतकऱ्यांना अपेक्षा असते. पिकविलेल्या पिकाच्या आर्थिक उत्पन्नावर शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे गणित ठरले जाते. मात्र एकीकडे निसर्ग तर दुसरीकडे शेतीपिकाला हमी भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा पदरमोड करावी लागत आहे. हा कांदा अगदी तुटपुंज्या दरात व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.
-शेतीपिकाला हमी भाव मिळत नाही
यंदा तरी कांद्याला भरपूर भाव मिळेल या आशेने केलेला कांदा, तुटपुंज्या दराने विकताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत आहेत.मात्र एवढा कांदा साठवूनही तो भाव वाढेपर्यत चांगला राहील याची खात्री देता येत नाही. दौंड तालुक्यातील वरवंड, हातवळण, कडेठाण, माळवाडी, पडवी, देऊळगाव गाडा, खोर, भांडगाव परिसरात कांदा साठवून ठेवण्यासाठी वखार बांधणे,तसेच कांदा आहे तसा बाजारात विक्रीसाठी पाठविण्याची लगभग सुरू आहे.
कांद्याचे भाव कमी झाले असले तरी शेतकरी ओळखीच्या लोकांना कांद्याचा वाणवळा म्हणून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ही सत्य परिस्थिती नाकारून चालणार नाही. यासाठी भविष्यात शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिके घेण्याची गरज आहे, असे मत कृषी क्षेत्रातील काही जाणकार व्यक्ती करत आहेत.