
जप्तीतील फक्त 70 वाहने मूळ मालकांना परत; दंड भरल्यानंतरही वाहनमालकांना प्रतीक्षाच
अकोला : विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन, कागदपत्रांची पूर्तता नसणे अधवा अन्य कारणांमुळे पोलिस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) जप्त करण्यात आलेल्या वाहनांची संख्या मोठी असली, तरी त्यापैकी आत्तापर्यंत केवळ ७० वाहनेच आहेत. संबंधित मालकांना परत करण्यात आली.
अकोला शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशन, शहर वाहतूक पोलिस, आरटीओ, एसपी कार्यालयात अनेक कारणांमुळे चारचाकी, दुचाकी, तीनचाकी यासह जड वाहने जप्त केली आहेत. मात्र, ती वाहने सोडवताना वाहनांचे विविध कागदपत्र नसणे किंवा न्यायालयीन प्रक्रियेमुळे वाहने सोडवताना वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कधी-कधी कागदपत्रे सादर करू न शकल्यामुळे वाहने धूळखात भंगारात जातात. पोलिस विभागाकडून वाहन जप्त केल्यानंतर त्याचा पंचनामा करून संबंधित वाहनाची नोंद केली जाते. त्यानंतर वाहन सोडविण्यासाठी वाहनमालकाला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.
दरम्यान, आरसी, विमा, वैध वाहनचालक परवाना यासह आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाते. संबंधित प्रकरणातील दंड किंवा शुल्क भरल्यानंतर वाहन सोडण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, केवळ दंड भरल्याने प्रत्येक प्रकरणात वाहन तत्काळ मिळतेच असे नाही. काही वाहनांवर गुन्हा अथवा न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास संबंधित न्यायालयाचा आदेश आवश्यक असते, वाहनमालक उपस्थित नसल्यास किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यासही वाहन सोडविण्याची प्रक्रिया रखडू शकते.
जप्त वाहनांवर लिलावाची टांगती तलवार
अनेक वाहने गुन्ह्यात जप्त केलेली असतात, तर काही वाहने चोरीला गेलेली असतात. गुन्ह्यात वापरलेले वाहने सोडवण्यासाठी न्यायालयीन आदेश महत्वाचे असतात. चोरीला गेलेले वाहने पोलिसांना सापडल्यावर संबंधित वाहनमालकाला कागदपत्राची पूर्तता करून न्यायालयात सादर करावे लागतात. न्यायालयाच्या आदेशाने संबंधित पोलिस स्टेशनला जात केलेले वाहने सोडून द्यावे लागतात, कमीत-कमी एका वर्षानंतर जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया आहे.