पाटस : दौंड तालुक्यातील डाळींब या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात अफूचे पिक आढळल्याने पाेलिसांनी कारवाई केली. यवत पोलिसांनी छापा टाकून बेकायदा अफूची लागवड करणा-याला अटक केली आहे.
ही माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशुभख यांनी दिली. अनिल बबन म्हस्के (वय ४२ वर्ष रा. उरूळीकांचन, पांडरस्थळ ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हवेली आणि दौंड तालुक्याच्या शिवेवर असलेल्या दौंड तालुक्याच्या हद्दीतील डाळींब गावातील जमीन गट नं/१७४ मधील शेतामध्ये अफूच्या झाडांची लागवड केल्याची माहिती यवत पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार यवत पोलीसांनी शनिवारी ( दि.९) छापा टाकला असता शेतात बेकायदा अफूच्या झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले.
आठ गुंठे पुदीनाच्या क्षेत्रामध्ये काही अंतरावरील ६ सरींमध्ये सुमारे ११९ किलो १८४ ग्रॅम वजनाची अफूची हिरवट रंगाची बोंडे व पाने असलेली झाडे असल्याचे निदर्शनास आले. त्याची एकूण किंमत अंदाजे २ लाख ३८ हजार ३६८ रुपये आहे. पोलिसांनी मुददेमाल जप्त करून म्हस्के याला सापळा रचून ताब्यात घेतले. याच्या विरूदध यवत पोलीस ठाण्यात गुंगीकारकण औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनीयम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके करीत आहेत.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस अक्षय यादव, निलेश कदम, महेंद्र चांदणे, राम जगताप, पोलीस शिपाई मारूती बाराते आदींनी ही कारवाई केली.