शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, चौफुला, करंदी ते केंदूर येथील रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याच्या कामाची खात्यांतर्गत चौकशी करून घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर कारवाई करा. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष यादव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अ. अ. सुलाखे तसेच सहाय्यक अधीक्षक अभियंता अ. चं. रोडगे यांना निवेदन दिले आहे. कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, चौफुला, करंदी ते केंदूर येथील रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता वर्तवून याबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष तेजस यादव यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माहिती मागवली होती. मात्र, एकशे सहा दिवस उलटून देखील माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, अपील केल्यानंतर खोट्या स्वरुपाची आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली. त्यामुळे सदर कामांची सखोल चौकशी करत दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे.






