मध्यरात्रीपर्यंत मद्यपान करून त्याच्या नशेत चारचाकी वाहन चालवून दोघांना चिरडून मारणाऱ्या धनाढ्य बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला अवघ्या १५ तासांमध्ये जामीन मिळाल्याने विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, नागरिक आक्रमक झाले आहेत. अनेकांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तांना भेटून कडक कारवाईची मागणी केली आहे.
पुणे : मध्यरात्रीपर्यंत मद्यपान करून त्याच्या नशेत चारचाकी वाहन चालवून दोघांना चिरडून मारणाऱ्या धनाढ्य बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला अवघ्या १५ तासांमध्ये जामीन मिळाल्याने विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, नागरिक आक्रमक झाले आहेत. अनेकांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तांना भेटून कडक कारवाईची मागणी केली आहे.
कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकरांनी येरवडा पोलिस ठण्यासमोर आंदोलन केले. यावेळी काँगेस पक्षाचे नेते मोहन जोशी यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी कल्याणीनगर येथील घटने प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे असे म्हणत पोलीस ठाण्यासमोर हातात नोटा घेऊन ठिय्या आंदोलन केले. ‘सुटला कसा? खाल्ले पैसे’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी माध्यमांशी बोलताना धंगेकर म्हणाले की, शहरात पब संस्कृती मोठ्या प्रमाणावर आहे. ती बंद करण्याच्या स्थानिक नागरिकांनी अनेकदा मागणी केली. पबची वेळ वाढवू नका, अशीही मागणी केली. पण त्याबाबत दखल घेतलेली नाही. एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडून मारले. यातील चालक मुलाला बाल सुधारगृहात पाठवायला हवे होते. त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. त्याला रेड कार्पेट टाकून घरी पाठवले. तपास अधिकाऱ्याची ही गंभीर चूक आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. या पोलीस ठाण्यात करोडो रुपयांचा व्यवहार झाला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, असेही धंगेकर यावेळी म्हणाले.
‘पब रात्री १२ वाजता बंद करावेत’
प्रियदर्शनी वुमेन्स फोरम बिटिया फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष संगीता तिवारी यांनी कल्याणीनगर येथील झालेल्या भीषण अपघाताबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘कोरेगावपार्क, कल्याणी नगर, विमान नगर, मुंढवा, बालेवाडी हाय स्ट्रीट, वानवडी ह्या भागामध्ये हुक्का बार आणि पब पहाटे पर्यंत चालू असतात. हे सर्व रात्री १२ वाजता बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, युथ काँग्रेसचे पूनमीत तिवारी उपस्थित होते.
महायुतीचे शिष्टमंडळही आयुक्तांकडे
‘पुणे हे विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला धक्का लागणारे प्रकार घडले आहेत. त्यात नाईट-लाईफ कारणीभूत असल्याचे समोर येत आहेत. यामुळे तरुण-तरुणी व्यसनाच्या अधीन होताना दिसत आहेत. यातूनच अशा दुर्दैवी घटनांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी पुणे पोलीस आयुक्तांची महायुतीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ , राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, अजय भोसले, योगेश टिळेकर, गणेश बीडकर, लतीफ शेख, डॅा. सिद्धार्थ धेंडे, रुपाली पाटील-ठोंबरे, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, हर्षदा फरांदे, संदीप खर्डेकर, दीपक पोटे, सुशील मेंगडे, राजेश येनपुरे, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.
Web Title: Outrage over that accused being granted bail statement of various parties organizations to the commissioner of police regarding the kalyaninagar accident nrdm