Boisar च्या नव्या Railway Goods Yard चा मार्ग मोकळा ( सौजन्य - सोशल मीडिया )
तारापूर एमआयडीसीतील स्टील, रासायनिक, कापड व अन्य उद्योगांमधून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील मालवाहतुकीसाठी हे यार्ड महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या बोईसर पश्चिमेकडील गुड् यार्ड विरार-डहाणू मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकच्या कामात अडथळा ठरत असल्याने ते काटकर पाडा परिसरातील नव्या ठिकाणी हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्याचे गुड्यार्ड स्थलांतरित झाल्यानंतर विरार-डहाणू रेल्वे मार्गावरील अतिरिक्त दोन मार्गिका टाकण्याच्या कामाला अधिक मोकळीक मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात उपनगरी, मालवाहतूक रेल्वे सेवांची क्षमता वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
नवीन यार्ड कार्यान्वित झाल्यानंतर तारापूर एमआयडीसीकडून येणारी अवजड मालवाहतूक नियोजित मार्गाने यार्डकडे वळवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे बिरसा मुंडा चौक व बोईसर-पालघर मार्गावरील अवजड वाहनांचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. चित्रालय परिसरातील नव्या यार्डमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेलाही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
तारापूर एमआयडीसीबरोबरच प्रस्तावित वाढवण बंदराच्या पार्श्वभूमीवर बोईसरमध्ये आधुनिक आणि मोठ्या क्षमतेचे गुड़ यार्ड उभारणे महत्त्वाचे मानले जात आहे. औद्योगिक मालाची रेल्वेमार्गे वाहतूक वाढल्यास रस्त्यावरील अवजड वाहतुकीचा भार कमी करण्यासही याचा उपयोग होऊ शकतो. वनजमिनीच्या हस्तांतरणाच्या बदल्यात पालघर जिल्ह्यातील सुमारे १० हेक्टर क्षेत्रावर पूरक वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी वनजमिनीचा वापर करताना पर्यावरणीय भरपाईची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.






