( सौजन्य - सोशल मीडिया )
रस्ता दुरुस्तीबाबत वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर दह्याळे, कांदरवाडी आणि ओसरविरा परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन देत खड्डे तातडीने बुजवण्यासह रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली. पंचायत समिती डहाणूचे कनिष्ठ अभियंता राहुल पिल्ले व आशय भोईर यांच्याकडे
ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने डहाणू बांधकाम विभागाचे अभियंताही मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. यावेळी दह्याळेचे सरपंच सुनील भोईर, माजी उपसरपंच कमल माळी, धिडे, राजू दळवी, कैलास सुतार, कृष्णा कोब, चितामण पटारा, रुपेश तल्हा, महेंद्र कोब यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अॅड. विराज गडग यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही प्रत्येक वेळी केवळ आश्वासने दिली जात आहेत. हा रस्ता हजारो आदिवासी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा आधार असून विद्यार्थी, महिला, वृद्ध, रुग्ण आणि गरोदर मातांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी खड्डे बुजवण्याच्या सूचना करूनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सूचनांना प्रशासन किती गांभीर्याने घेते, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता खड्डूचांवर तात्पुरती मलमपट्टी नको तर दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्ता दुरुस्ती झाला पाहिजे. सणासुदीपूर्वी काम सुरू झाले नाही, तर ग्रामस्थांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा अॅड. गडग यांनी दिला.
तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाने समाधान न मानता कायमस्वरूपी कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे पुढील आंदोलनाची भूमिका प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीवर अवलंबून राहणार आहे.






