शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा (फोटो सौजन्य-ChatGPT)
Weather Update: एल-निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचे असमान चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरमध्येही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.(Weather Update)
राज्यातील 36 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या आसपास पाऊस झाला असून केवळ चार जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदले गेले आहे. मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सुमारे 47 ते 48 टक्क्यांपर्यंत पावसाची तूट आहे.
पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 10 आणि 11 सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भागांतही हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात.
तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. आधीच पावसाची तूट असलेल्या भागांसाठी मात्र मोठ्या आणि व्यापक पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.
12 सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खान्देश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
13 सप्टेंबर रोजी राज्यातील पावसाचा विस्तार आणखी वाढण्याची शक्यता आहे. पालघर, नाशिकचा घाट परिसर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, वर्धा आणि यवतमाळ या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राबरोबरच देशातील इतर काही भागांतही पावसाची शक्यता आहे. 10 सप्टेंबरला ओडिशामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच 13 आणि 14 सप्टेंबरला मध्य प्रदेशातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पुढील काही महिन्यांत एल-निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असल्याने हवामानाच्या पुढील वाटचालीकडे लक्ष लागले आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्याचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे हिंदी महासागरात पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल (Positive IOD) विकसित झाल्यास त्याचा काही प्रमाणात अनुकूल परिणाम होऊ शकतो. राज्यात आधीच पावसाची मोठी तूट असल्यामुळे आता सप्टेंबरमधील उर्वरित पाऊस खरीप पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची तूट भरून निघते का, याकडे शेतकऱ्यांसह हवामान तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.






