
दिवाळीत आदिवासी कुटूंबावर दुःखाचा डोंगर! मोखाडा रुग्णालयात डॉक्टर नसल्याने प्रसूतीत बालकाचा मृत्यू
दीपक गायकवाड/मोखाडा: पालघर मधील मोखाडा ग्रामीण रुग्णालयात बुधवारी दिनांक 22 ला सकाळी दाखल केले होते. मात्र प्रसूती दरम्यान केवळ एक परिचरिका उपलब्ध होती.त्या ठिकाणी डॉक्टर हजर नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. वैशाली बात्रे असे पीडित महिलेचे नाव असून ऐन दिवाळीत बाल मृत्यू घडल्याने मोखाडा तालुक्यात खळबल उडाली आहे आणि आरोग्य यंत्रनेचे लक्तरे वेशिवर टांगली गेली आहेत. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
खोडाळा येथील वैशाली अशोक बात्रे या आदिवासी महिलेची प्रसूती डॉक्टरांच्या अनुपस्थितीत झाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडल्याने स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
वैशाली बात्रे यांना बुधवारी, दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी प्रसूती वेदना जाणवल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात केवळ एक परिचारिका उपस्थित होती, तर कोणताही वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी नव्हता. तब्बल 12 तास कोणतीही वैद्यकीय तपासणी किंवा सल्ला मिळाला नाही. रात्री 10 वाजता प्रसूती करण्यात आली, परंतु त्या वेळीही तज्ज्ञ डॉक्टर अनुपस्थित होते.
सदर बालकाला केवळ दोन नाळ असल्याचे आणि वार अस्थिर असल्याचे सोनोग्राफी अहवालात स्पष्ट झाले होते, तरीही योग्य काळजी घेण्यात आली नाही. प्रसूतीनंतर बाळाचा मृत्यू झाला आणि मृत बालक तसेच आईला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अशोक बात्रे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले,“माझ्या पत्नीला सकाळी रुग्णालयात दाखल केल्यावर तेथे एकही डॉक्टर नव्हते. फक्त एका परिचारिकेच्या भरवशावर प्रसूती पार पडली. वेळेत वरिष्ठ रुग्णालयात हलवले असते, तर आज माझे बाळ जिवंत असते.”
याबाबत विचारणा केली असता, मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भारतकुमार महाले यांनी सांगितले की,“सदर बालकाला तीन नाळ असणे आवश्यक होते, परंतु दोनच नाळ होत्या आणि वार नीट नव्हती. त्यामुळे प्रसूतीदरम्यान बाळ दगावण्याची शक्यता अधिक होती.”
दरम्यान, या घटनेवर स्थानिक सत्ताधारी भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणावर सडकून टीका केली आहे. परिणामी, सत्ताधाऱ्यांनीच आपल्या सरकारच्या आरोग्य व्यवस्थेचे लक्तरे वेशीवर टांगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.