क्षितीज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर 'पिवळे वादळ' (Photo Credit- X)
वसई । रविंद्र माने: वसई तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे दररोज गंभीर अपघात होत असतानाही झोपेचे सोंग घेतलेल्या वसई-विरार महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) ‘पिवळ्या वादळाने’ रविवारी सायंकाळी महापालिका मुख्यालयावर धडक दिली. यावेळी माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना ‘४०० कोटींची एफ.डी. गेली कुठे?’ असा थेट जाब विचारला.
तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. विरारमधील नागरिक प्रताप नाईक यांचा दुचाकी खड्ड्यात घसरून झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर एक मुलगी अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहे.
खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, शववाहिनी आणि अग्निशमन यांसारख्या अत्यावश्यक सेवा अडकून पडत आहेत. शाळा-कॉलेज आणि कामावर जाणाऱ्यांना दररोज सुट्ट्या घ्याव्या लागत आहेत.
एवढी भयानक परिस्थिती असतानाही महापालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांना गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव खड्ड्यांतच साजरा करावा लागला.
विरार, मुंबई: वसई-विरार शहर में सड़कों पर बने गड्ढों को लेकर वसई-विरार शहर महानगरपालिका के अधिकारियों को एक ज्ञापन सौंपा गया। यह ज्ञापन पूर्व विधायक हितेंद्र ठाकुर द्वारा दिया गया। इस अवसर पर पूर्व विधायक क्षितिज ठाकुर, पूर्व सांसद बलिराम जाधव, तथा पार्टी के अनेक वरिष्ठ पदाधिकारी… pic.twitter.com/Y1o4zV0WEw — मुकेश त्रिपाठी- Mukesh Tripathi/✍️ (@mukesht37) October 5, 2025
या सर्व प्रकाराचा जाब विचारण्यासाठी बविआने विरार येथील महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला. दुपारी ३ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत या मोर्च्यात तालुक्याच्या सर्व भागातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रिक्षाचालक संघटना, उत्तर भारतीय विकास सेना यांसारख्या अनेक संघटनांनीही सहभाग घेतला.
यावेळी क्षितीज ठाकूर यांनी पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. ते म्हणाले, “आमच्या कार्यकाळात ४०० कोटी रुपयांची एफ.डी. करण्यात आली होती, तिचे पैसे कुठे गेले? पालिकेने एकाच रस्त्यावर चार-चार वेळा खर्च करणाऱ्या निविदा काढल्याची आकडेवारी यावेळी त्यांनी जाहीर केली.
“आम्ही कामे केली, रील्स नाही बनवल्या. रस्त्याच्या कामाबाबत एकतर एमएमआरडीएचे अधिकारी आमदारांना मूर्ख बनवत आहेत, किंवा आमदार नागरिकांना मूर्ख बनवत आहेत,” असा सणसणीत टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांवर लगावला. बविआचे संघटक सचिव अजित पाटील, माजी सभापती पंकज ठाकूर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक या मोर्च्यात सहभागी झाले होते. या भव्य मोर्चाने ‘झोपलेल्या’ प्रशासनाला खऱ्या अर्थाने जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे.