फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: वातावरण बदलाचे वाढते संकट लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी आता महामुंबईला ऑक्सिजन पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. एक कोटी बांबू वृक्ष लागवड करण्याच्या ‘मिशन बांबू’ उपक्रमाची सुरुवात पालघर जिल्ह्यात झाली असून, यामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न होणार आहे. १६ मे रोजी सातवली (पालघर) आणि उसगाव (वसई) येथे ‘बांबू मिशन शेतकरी मेळावे’ आयोजित करण्यात आले. यात आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी राज्यस्तरीय आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले की, आदिवासींना मिळालेल्या वनपट्ट्यांवर बांबू लागवड करून त्यांना रोजगार, उत्पन्न आणि पर्यावरण रक्षणाची संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्री पर्यावरण संतुलन कृती दलाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले की, वातावरण बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी जलद गतीने वाढणारा बांबू हा सर्वोत्तम पर्याय आहे. बांबू लागवडीसाठी शासनाकडून ७ लाख ४ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असून, बांबूपासून २ हजारांहून अधिक वस्तू बनवता येतात.
वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या की, पारंपरिक शेती परवडत नाही, त्यामुळे आदिवासींना आता पर्याय म्हणून बांबू लागवड करावी लागेल. यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच रोजगार निर्माण होईल. कॉन्बॅकचे व्यवस्थापकीय संचालक संजीव करपे यांनी सांगितले की, सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीतून यश मिळवले आहे. पालघरमध्ये बांबूची मोठी संधी असून जिल्ह्याने यात आघाडी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मनरेगा अंतर्गत उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांनी अनुदान प्रक्रियेबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, श्रमजीवी संघटना, कृषी, ग्रामविकास, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले. १७ ते १९ मे दरम्यान वाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, मोखाडा आणि जव्हारमध्ये मेळावे होणार असून, बांबू मिशनचा हा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी नवा टप्पा ठरणार आहे. पालघरच्या वाड्यांमधून आता मुंबईसह संपूर्ण राज्याला हरित श्वास मिळणार आहे.