भाईंदर/ विजय काते : देशभरात काही ठिकाणी पावसाचं आगमन झालं आहे. मुंबई आणि उपनगरीय परिसरात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी होत आहेत. .याचपार्श्वभूमीवर भाईंदरमध्ये रहदारी असलेला रस्ता खचल्याची बातमी समोर आली आहे. भाईंदर पूर्वमधील इंद्रलोक परिसरात आज दुपारी एक गंभीर घटना घडली. तपोवन शाळेच्या मागील भागात एका खाजगी बिल्डरकडून सुरू असलेल्या पायलिंगच्या कामादरम्यान अचानक जमीन खचली आणि संपूर्ण रस्ता ढासळला. काही वेळापूर्वी आलेल्या जोरदार पावसामुळे जमिनीचा कस ढिला पडला आणि ही दुर्घटना घडली.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्या ठिकाणी काम करणारे मजूर प्रसंगावधान राखत तातडीने सुरक्षित स्थळी पोहोचले आणि जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. मात्र, ही घटना एक गंभीर प्रश्न उभा करते – जेव्हा खाजगी बिल्डर महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बांधकाम करतात, तेव्हा सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष का केले जाते?स्थानीय नागरिकांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला असून, महानगरपालिका आणि संबंधित बिल्डर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. घटनास्थळी मोठे खड्डे पडले असून, रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
पावसाला अजून सुरुवातही झाली नाही तोच रस्ता खचल्याची बाब गंभीर आहे. या सगळ्या घटनेमुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक चौकशीत असे दिसून येत आहे की, बांधकाम स्थळी कोणतीही सुरक्षात्मक तटबंदी किंवा योग्य पूर्वतयारी केली गेली नव्हती. पावसामुळे माती साचल्याने आणि पाण्याचा दाब वाढल्यामुळे जमीन खचली आणि ही दुर्घटना घडली.घटनास्थळी मिळालेले फोटो आणि व्हिडिओ हे दुर्घटनेच्या भयावहतेची साक्ष देतात.
सध्या मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून, “बिल्डर लॉबीच्या मनमानीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत,” अशी मागणी केली आहे.