सोलापुरातून चिमुरडीला पळवले, पैंजण काढून मोडनिंबमध्ये सोडले
सोलापूर : मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकावर आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेने पळवले. तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत तिला मोडनिंब येथे एका लग्न समारंभात सोडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल केली. त्यानंतर अवघ्या सहा तासांत तिचे आई-वडील मोडनिंबमधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले. मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले.
बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्नकार्य शुक्रवारी मोडनिंब येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू होते. अक्षताच्या वेळी चिमुरडी वऱ्हाडी मंडळींना रडताना दिसली. तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे, एवढेच सांगत होती. या अडीच वर्षांच्या चिमुकलीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली.
दरम्यान, संशयित महिलेने चिमुरडीला मोडनिंब येथे माळी यांच्या लग्नकार्यात सोडून दिले. तेव्हा तिच्या कानातील सोन्याची रिंग व पैंजण पायात नव्हते. पोलिस पथकातील कॉन्स्टेबल अजय चव्हाण, सुधाकर माने, अमोल खरटमल, सूरज सोनवलकर यांनी मोडनिंबमधील लग्नस्थळ गाठले. तेथून तिला ताब्यात घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन केले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने व पोलिस निरिक्षक तानाजी दराडे, एपीआय रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सीसीटीव्ही तपासले
पोलिसांनी तत्काळ स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली. तपासात ती लातूर-कल्याण एसटीमधून जात असल्याचे दिसून आले. त्या एसटीचे वाहक संतोष वाघमारे यांना संपर्क साधेपर्यंत बस टेंभुर्णीपर्यंत गेली होती. परंतु, संशयित महिला मोहोळ स्थानकावर उतरल्याचे वाघमारे यांनी सांगितले. पोलिस पथक पाठलागावर होती.