Panchgani Table Land traders shut down in protest against Pahalgam Terror Attack
पाचगणी : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा निष्पाप लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज (दि.24) पर्यटन स्थळ पांचगणी येथील टेबल लँड व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत आपला निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन ही कृती करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली.
मंगळवारी (दि.22) सायंकाळीच्या सुमारास जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. निरपराध पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची निघृणपणे हत्या करण्यात आली. ही बातमी समजताच पांचगणी या पर्यटन स्थळावरील टेबल लँड पठारावरील सर्व व्यापारी संतप्त झाले. आज सकाळी एकत्र येत या घटनेचा सर्वांनी निषेध व्यक्त केला. सकाळी सर्वजण एकत्र आले . टेबल लँड पठारावरील सर्व व्यवसाय पूर्णपणे, कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवला व टेबल लॅन्ड वरील व्यावसायिकांनी हातात श्रध्दांजलीचा बॅनर घेऊन मूक मोर्चा काढला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
टेबल लॅन्ड नाक्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा एसटी स्टँड, मुख्य बाजारपेठेतून पोलीस ठाण्यात पोहचला. या घटनेविरोधात पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी या पर्यटकांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करून यातील दहशतवाद्यांना तातडीने अटक करून त्यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन पाचगणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना देण्यात आले.
आज (दि.24) सकाळपासून टेबल लँड पठारावरील दुकाने, हॉटेल्स, खेळण्याची दुकाने , घोडे सवारी पूर्णपणे बंद आहेत. या मोर्चात सर्व व्यापारी सहभागी झाले होते. यावेळी टेबल लँड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष नामदेव चोपडे सेक्रेटरी दिलीप कांबळे, सह खजिनदार संभाजी कांबळे तसेच सर्व पदाधिकारी आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिवसभर टेबल लॅन्ड पठारावरील सर्व व्यवहार बंद असल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली होती.
पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज (दि.24) नवी दिल्ली इथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 06 वाजता ही बैठक संसद भवनात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीत माहिती देण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात सरकारने योजलेल्या उपायांबद्दल ते सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देणार आहेत. यामुळे भारत यापुढे काय भूमिका घेणार आणि काय प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या भारतावरील दहशदवादी हल्ल्याचे परिणाम दिसून येत आहे.दिल्लीमध्ये विविध देशांच्या राजदूतांची देखील बैठक पार पडत आहे. यामध्ये कॅनडा, जर्मनी, चीन अशा अनेक देशांचे राजदूत उपस्थित असून हल्ल्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती दिली जात आहे.