
राज्यात महायुती ! पंढरपूरातल्या नेत्यांची मित्र पक्षांकडे पाठ? नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार
पंढरपूर/नवनाथ खिलारे : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. अशातच आता राज्यात महायुतीची सत्ता, पंढरपूरात काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिल्याने महायुतीतल्याच मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आजतरी स्वतंत्र राजकीय चूल मांडली आहे. यामुळे येथील नगरपरिषदेची आगामी निवडणूक अधिक चुरशीची होईल असे दिसत आहे.
खरेतर आरक्षण सोडत जाहीर होण्याच्याआधीच नगरपरिषदेच्या निवडणुकीची उत्सुकता लागून असलेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या परीने जनसंपर्क वाढविला आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर होताच पक्षप्रमुख अधिक सक्रिय झाले. शहरातील राजकीय धुरंधर म्हटले जाणारे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्यातला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता, पंढरपूरात काय? हा प्रश्न अधिक चर्चेत आला आहे.
राज्यात मित्रपक्ष म्हणून सत्तेत असले तरी पंढरपूरात या आजी- माजी आमदारांची मैत्री होईल का याबद्दल अनेकांमध्ये साशंकता आहे. या सगळ्याच घटनांच्या अनुषंगाने स्थानिक राजकीय पटलावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही गोटात सध्या संभ्रमाचे वातावरण दिसत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे खास सुकानी समिती निर्माण करण्यात आली असून, या समितीचे सदस्य कल्याणराव काळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या समितीत काळे यांच्यासह शहरात प्रभाव असलेले अन्य नेते आहेत.
भाजपाने विधानसभा निवडणुकीत धार्मिक मुद्दे पुढे केल्याने साहजिकच प्रभाव असलेला भाग अधिक मजबूत करण्यासाठी भाजपाने संधी सोडलेली नाही. माजी आमदार प्रशांत परिचारक यांना पद देऊन त्यांच्या नेतृत्वाला महत्व देणे हा त्याचाच एक भाग आहे. परिचारक हे त्यांच्या प्रभावाखालील भागातून पक्षाला बळकटी मिळवून देऊ शकतील, अशी तजवीज पक्ष नेत्यांनी केली आहे.
शिवसेना शिंदे गटाची अवस्था आणखीनच पाहण्यासारखी आहे. या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सोलापूरसाठी दिलेले तीन- तीन जिल्हाध्यक्ष आणि या सर्वांचेच मुख्यालय सोलापूर शहर आहे. यामुळे पंढरपूर शहरात नेमक्या कोणत्या जिल्हाध्यक्षांचा किती प्रभाव असणार आहे, हे पाहिले जाणार आहे. जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी सोलापूर जिल्ह्यातील आणि अक्कलकोट शहरातून शेकडो प्रवेश घडवून आणले आहेत. साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेले पॅनल निवडून आणण्याचे कसब साठे यांनी यापूर्वीच दाखवून दिले आहे.
मूळ शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणारा राज्यातला पहिला समर्थक म्हणून महेश साठे यांची ओळख आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टोकाची टीका होत असताना साठे यांनी स्थानिक विरोधकांशी दोन हात केले. ही पार्श्वभूमी प्रस्थापित भाजप नेत्यांनाही ठाऊक असल्यामुळे साहजिकच साठे यांच्या राजकीय चालीचा विचार साऱ्यांनाच करावा लागणार आहे. तथापि, नगरपालिका निवडणूक त्यांनी पक्षादेशाच्या निर्णयावर ठेवली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर नगरपरिषद निवडणुकीबाबत विविध घडामोडींवर शक्य तसा तर्क काढण्यात येत आहे.
मागील नगरपरिषद निवडणुकीत परिचारक प्रणित भाजपने ३६ प्लसचा नारा देत २२ नगरसेवक निवडून आणले आणि नगरपरिषदेवर पहिल्यांदा बहुमताने सत्ता स्थापन केली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीला इतर जागांवर समाधान मानावे लागले होते.