
विठ्ठलनामाचा गजर थेट लंडनहून! पंढरीची वारी झाली ग्लोबल; लंडन ते पंढरपूर ५० दिवसांत ११ देशांचा प्रवास
पंढरपूर / शिवाजी हळणवर : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि भक्तीचा आत्मा मानली जाणारी आषाढी वारी आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. विठ्ठलनामाचा गजर करत जगातील पहिली ‘ग्लोबल दिंडी’ थेट लंडनमधील विंडसर येथून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. विशेष म्हणजे ही दिंडी तब्बल ११ देशांचा प्रवास करत २६ जुलैला म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.
भगव्या पताका, टाळ-मृदुंग, पालखी आणि विठ्ठलभक्तांच्या जयघोषाने लंडनमधील वातावरण अक्षरशः वारकरीमय झाले. इंग्लंडसह युरोपमधील शेकडो मराठी भाविक या अनोख्या दिंडीत सहभागी झाले आहेत. लंडन, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, लक्झमबर्ग, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, तुर्की आणि जॉर्जिया असा प्रवास करत ही दिंडी भारतात दाखल होणार आहे.
या दिंडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रस्थानावेळी १०० ढोल-ताशांचा एकत्रित निनाद झाला. त्यामुळे लंडनमध्ये मराठी संस्कृतीचा अनोखा ठसा उमटला. ही संकल्पना अहिल्या नगर जिल्ह्यातील परंतु लंडन येथे वास्तव्यास असलेले विठ्ठलभक्त अनिल खेडकर यांनी साकारली असून जगभरातील मराठी समाजाला वारीच्या परंपरेशी जोडण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.
पंढरपूरची वारी ही केवळ यात्रा नसून महाराष्ट्राच्या अध्यात्म, संस्कृती आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. आता हीच परंपरा जागतिक स्तरावर झेपावत असल्याने ‘वारी ग्लोबल झाली’ अशी भावना वारकरी आणि मराठी बांधव व्यक्त करत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विठ्ठलभक्त अनिल खेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राची वारी परंपरा जागतिक पातळीवर पोहोचल्याची भावना व्यक्त केली जात आहे. युरोपातील विविध शहरांमध्ये मुक्काम करत ही दिंडी पुढे सरकणार असून प्रत्येक ठिकाणी विठ्ठलभक्तीचा संदेश दिला जाणार आहे.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदी येथून ८ जुलै रोजी प्रस्थान होणार आहे. पारंपरिक वारीबरोबरच यंदाची ही जागतिक दिंडी आषाढी वारीचे विशेष आकर्षण ठरणार आहे. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा जागतिक विस्तार घडविणाऱ्या या उपक्रमाकडे वारकरी संप्रदायासह राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.
ईस्राइल मध्ये स्थापन होणार छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा! महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण!