मुंबई – महापुरुषांचे जातीवरून तुकडे करू नका, असे आवाहन सोमवारी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. त्या गोपीनाथ गडावर बोलत होत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बोलताना पंकजा भावूक झाल्या. यावेळी त्यांच्या बहीरण खासदार प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या.पंकजा मुंडे यांनी महापुरुषांचे अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध म्हणून अर्धातास मौन यावेळी पाळले. तसेच शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पंकजा पुढे म्हणाल्या की, जेवढं राजकारण्यांनी बदलायची गरज आहे, तेवढेच मतदारांनी बदलायची गरज आहे. पैसा, पावरच्या जिवावर राजकारण करायचे असेल, तर लेकरांचे भविष्य धोक्यात आहे. कृपा करून महापुरुषांना जातीत वाटू नका. छत्रपती आमचे, भगवान बाबा आमचे. कृपा करून असे करू नका. आमच्यासारखे नेते महापुरुषांना जातीत वाटतायत. असे करू नका. शिवरायांनी परकीय आक्रमण नेस्तनाबूत करण्यासाठी तलवार उचलली. त्यांनी विशिष्ट समाजासाठी काम केले नाही. फुले, आंबेडकरांनी विशिष्ट समाजासाठी काम केले का, आता पुन्हा म्हणेल दोन-तीन जणांचे नावे घेतले. कृपा करून महापुरुषांचे तुकडे जातीवरून करू नका. ही मुंडे साहेबांची शिकवण होती.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला काही तरी मिळवायचं म्हणून मी कुणासमोर जाण्याचे कारण नाही. मला काय मिळवायचे ते मी मिळवेन. मुंडे साहेबांचे प्रत्येक स्मरण ऊर्जा देते. सगळे सोडून संन्यास घ्यावा वाटतो, पण जेव्हा एक छोटी मुलगी गोपीनाथ मंडे साहेबांवर गाणं म्हणते. एखादी मुलगी भाषण करते. तेव्हा हे मिळवले ते कुठल्याही पद प्रतिष्ठेपेक्षा मोठे वाटते.
तुम्ही का आलात इकडे? माझ्याकडे काय आहे? मी फक्त ऊर्जा, आशीर्वाद देऊ शकते. मुंडे साहेबांच्या मनात अनेक विचार होते. हे करायचे, ते करायचे. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर एवढे वर्ष होऊनही अजूनही बायका डोळ्याला पदर लावतात. मला मीडिया मुंडे साहेबांविषयी आठवणी विचारतात. काय आठवणी सांगणार, असा सवालही पंकजा यांनी केला.
मुंडे साहेबांनी ओबीसी आरक्षणाचे बिल मांडले. नामांतर चळवळीत सहभागी झाले. भूमिका पक्षाच्या व्याप्तीत बसवण्याचा प्रयत्न केला. आज शरद पवारांचाही वाढदिवस आहे. त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देते. अतिवृष्टीमुळे शेतकरी परेशान झालाय, असा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, दहावेळा दिल्लीतल्या अकबर रोडवरून जाते. असं वाटतं थांबावं, आक्रोश करावा. आपण आपल्या पित्यासाठी आक्रोश करू शकत नाही. त्यांना काय झालं असेल, बोलू शकत नाही. कुठलाही पराभव, कुठलंही दुःख कधीही बाजूला जावून बळ माझ्या पायात आहे. केवळ मुंडे साहेबांच्या संस्कारामुळे. चौदा दिवस घोंगडीवर बसले होते मी. गोडजेवण होईपर्यंत. कोण भेटायला आले माहित नाही. सगळं अंधुक दिसत होतं, असे म्हणत त्या यावेळी भावूक झाल्या.