
Parbhani Zilla Parishad Political News Internal Strife Between Shiv Sena and BJP
Maharashtra Politics : परभणी : बाळासाहेब काळे : जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेसेनेला बाजूला सारून सत्ता बनवण्याची रणनीती भाजपने आखली आणि राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता स्थापन केल्याने नाराज झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. या पार्श्वभूमीवर आता २ एप्रिलला समित्यांच्या पदाधिकारी निवडीसाठी बोलावलेल्या विशेष सभेत शिवसेना सहभागी होणार की नाही? हा प्रश्नच आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या (Parbhani News) चार सभापतींची निवड करण्यासाठी २ एप्रिल २०२६ रोजी विशेष सभा घेण्यात येणार आहे. यामध्ये आता भाजपला २, राष्ट्रवादीला १ तर शिंदेसेनेला एक सभापतीपद मिळणार आहे. मात्र सभापती पद सोडून विरोधी बाकावर बसण्याची घोषणा करणाऱ्या शिंदेसेनेला समजावण्यात भाजपच्या नेत्यांना यश येते की त्यांचा विरोध कायम राहतो? हे पाहावे लागणार आहे. (Political News)
परभणीमध्ये भाजप-शिंदेसेनेने एकत्र येऊन अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडण्याचे निश्चित केले होते. मात्र नंतर शिंदेसेना, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती होणार अशी शक्यता गृहीत धरून भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर यांच्या भावाला उपाध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. यावेळी भाजपचा अध्यक्ष, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष तर शिंदेसेनेचा पंचायत समितीत सभापती करू, असे आम्हाला सांगण्यात आले.
हे देखील वाचा : भाजपचे चाणक्य उतरणार मैदानात; ममता बॅनर्जींविरोधात दाखल करणार खळबळजनक चार्जशीट
फसवणूक झाल्याची भावना झाली निर्माण
मात्र आमची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्याने आम्ही अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपासून दूर पहिलो, असे शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना कळवले आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीव्या प्रचारकाळात आणि निकालानंतरही भाजपच्या राज्यातील शीर्षस्थ नेत्यांनी, ‘आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढलो तिथे आणि एकत्र लढलो नाही तिथेही पदाधिकारी निवडीच्यावेळी एकत्र राहू’ असे वेळोवेळी सांगितले गेले होते पण त्याला आता खो दिला जात असल्याचे शिंदेसेनेचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरजच पडणार नाही असे सांगत भाजपने सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेसोबत जाण्याचा दावा निकालाच्या दिवशीच केला होता. त्यानंतर भाजपला सत्तेबाहेर ठेवून इतर सर्वजण एकत्र बाले तरीही सत्तेचे गणित बसविता येते, ही बाब पुढे आली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सारे विरोधक एकवटल्याचे चित्रही पहावयास मिळाले. राष्ट्रवादीने पुढाकार घेतला तर उद्धवसेनेने पाठिबा याची तयारी खुल्या मनाने केली होती. तरीही गणित जुळत नसल्याने शेवटी शिंदेसेनेला अध्यक्षपद हाच एकमेव पर्याय उरत होता. त्यासाठी राष्ट्रवादीही आधीपासूनच तयार असली तरी ही गणिते उघड झाली नव्हती.
हे देखील वाचा : एका बाजूला ‘Purple Day’चा माणुसकीचा हात, तर दुसरीकडे स्वतःची सुट्टी शोधण्याचा आनंद; वाचा ‘या’ दिवसाचे महत्त्व
राष्ट्रवादीसोबत उद्धवसेना व काँग्रेसचे २ सदस्य सहलीवर गेल्याचे ऐकायला मिळत बसतानाही शिंदेसेनेच्या गोटात शांतता होती. दुसरीकडे शिंदेसेनेला भाजपकडून उपाध्यक्षपदाची तर राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदाची ऑफर होती. यातील नेमकी कोणती स्वीकारायची? या गोंधळात वेळ निघून गेली. ते कोणासोबत जाणार ही बाब शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न झाला. परिणामी, त्यांची प्रवस्था ‘तेल गेले, तूपही गेले आणि हाती धोपाटणे आले’ अशी झाली. आता शिंदेसेना महायुतीत सहभागी होऊन सभापती पदावर दावा करणार की उद्धवसेना, काँग्रेसप्रमाणे विरोधी पक्षात जाऊन बसणार? हे २ एप्रिललाच स्पष्ट होईल. सभापती पदासाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच आहे. अध्यक्ष पदालाही अनेकांची फिल्डिंग होती. मात्र शेवटी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी फासे टाकले अन् सगळ्यांचे गणित चुकवून लता वाकळे अध्यक्षपदी विराजमान झाल्या.