
बीड : बीड जिल्ह्यातील परळी शहरच्या पोलिसांनी पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन केली मोठी कारवाई केली आहे. एक वर्षापूर्वी परळी शहरातील एका व्यापाऱ्यास कमी दरात सोने देतो म्हणून चाळीस लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पाकिस्तान बॉर्डर वर मात्र गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणच्या जंगलात जाऊन जीवावर उदार होत परळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ व डीबी शाखेचे भास्कर केंद्रे यांनी मुसक्या आवळून मुद्देमालासह आरोपीला जेरबंद केले. या कारवाईमुळे शहर पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दरम्यान मागच्या १ वर्षापूर्वी परळी शहरातील एक व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणी राहत असलेला एक चतुर महाठक जीसूप मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर ह्या दोघांनी सुरुवातीस स्वस्तात सोने देतो म्हणून पाच लाखांचे सोने दिले यावर शंकर शहाणे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला.
व्यवहार करतेवेळी जीसूप कक्कळ याने आपले नाव बदलून अब्बास आली, अशा नावाचा वापर केला होता. ठरल्याप्रमाणे जिसुप कक्कळने शंकर शहाणे यांना ठरल्याप्रमाणे पाच लाखांचे सोने दिल्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि नंतर जिसुप कक्कळने आणखी स्वस्तात सोने देतो म्हणून शंकर शहाणे यांच्याकडून नगदी रोख चाळीस लाख घेऊन गेला. ४० लाख घेऊन गेल्यानंतर जवळपास सहा महिने जीसुप हा शंकर शहाणे यांना सोने न देता बोटावर खेळवत राहिला. कोरोणाचा काळ आहे आज उद्या सोने देतो म्हणून टोलवाटोलवी करीत राहिला. जिसुप कक्कळ व सिकंदर आपली फसवणूक करीत आहे हे लक्षात येताच शंकर शहाणे यांनी १ वर्षापूर्वी शहर पोलीस ठाणे गाठीत रितसर फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हाही दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस जिसुप कक्कळ आणि सिकंदर यांच्या मागावर होती. व्यवहार करताना जिसुप कक्कळने आपले नाव बदलून अब्बास आली असे नाव ठेवल्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेण्यास अनंत अडचणी येत होत्या. आरोपींच्या शोधात शहर पोलीस ठाण्याचे पथकाने मुंबई, नागपूर, अमरावती, बुलढाणा, भोकरदन, सोलापूर आदी प्रमुख भागात शोध घेतला मात्र सापडून येत नव्हते. मात्र पोलीस अधीक्षक लांजेवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक सुनील जायभाय व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, श्रीकांत राठोड यांनी कोणत्याही परिस्थितीत आरोपी शोधण्याचा चंग बांधला आणि थेट मुंबई गाठली.
त्याठिकाणी जंग जंग पछाडले एका खबऱ्याकडून हा आरोपी त्याचं मूळ नाव जीसूप कक्कळ असून तो पाकिस्तान बॉर्डर वरील भुज कच्छ भागातील जंगला लगत राहतो अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, भास्कर केंद्रे गोविंद भताने व श्रीकांत राठोड यांनी आपला मोर्चा भूज कच्छ कडे वळवला. त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपींची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की हे आरोपी फार खतरनाक असून त्यांच्यापर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाही. त्यांच्या आपसातील दोन गटाच्या भांडणांमध्ये १४ मर्डर झाले होते. त्यामुळे तुम्ही त्यांना घेऊन जाण्याच्या फंदात पडू नका परत फिरणार नाहीत.
तरीही गुजरातच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्याला भीख न घालता भार्गव सपकाळ आणि भास्कर केंद्रे यांनी तपासाची चक्रे तेज करीत आरोपी जीसूप कक्कळ हा भुज कच्छ पासून १७ किलोमीटर अंतरावरील रतिया या ठिकाणच्या फार्महाऊसमध्ये राहतो असे समजल्या वरून त्यांनी आपला मोर्चा रतीयाकडे वळवला. रतिया पासून पाकिस्तान बॉर्डर केवळ ७० किलोमीटर अंतरावर आहे. आरोपीस पोलीस आहेत हे समजू नये म्हणून भास्कर केंद्रे यांनी अक्षरशा एका मतीमंद व्यक्तीसारखे रूप धारण केले. आणि मदतीसाठी स्थानिकचे चार पोलिस कर्मचारी सोबत घेऊन आरोपीचे फॉर्म हाऊस गाठले. स्थानिक पोलिसांना आरोपीच्या बंगल्याच्या समोरचा दरवाजा वाजवण्यास सांगितले अशात आरोपी मागच्या बाजूने जंगलात पळून जाणार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ व भास्कर केंद्रे मागच्या बाजुला जंगलात दडून बसले. झाले तसेच आरोपी जिसूप कक्कळ हा मागच्या दाराने जंगलात पळून जात असतानाच भास्कर केंद्र यांनी आरोपीच्या कानफटात रिवाल्वर लावीत मुसक्या आवळीत जेरबंद केले. अशा प्रकारेच दुसरा आरोपी सिकंदर याच्याही मुसक्या आवळल्या.
[read_also content=”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधा-यांचा डाव!: नाना पटोले https://www.navarashtra.com/maharashtra/dr-the-instinct-of-the-central-authorities-to-end-the-constitution-given-by-babasaheb-ambedkar-nana-patole-nrdm-268909.html”]
मुद्देमाल रोख ४० लाख रुपयांसह आरोपी मोठ्या शिताफीने ताब्यात घेत परळी आणले. आपल्या जीवावर उदार होऊन खतरनाक आरोपींच्या मुसक्या आवळून मुद्देमालासह जर बंद केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, श्रीकांत राठोड यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.