फोटो सौजन्य: iStock
माथेरान हे लोकप्रिय पर्यटनस्थळ असल्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या शेवटच्या आठवड्यात येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. शुक्रवारपासून माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असून, हे सर्व पर्यटक नेरळ-माथेरान घाटरस्त्याचा वापर करत आहेत. यामुळे सकाळच्या वेळेस घाटरस्त्यावर वाहनांची वर्दळ अधिक असून वारंवार वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होत आहे.
मात्र यंदा नेरळ-माथेरान प्रवासी टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पुढाकार घेत विशेष भूमिका बजावली. सलग दोन दिवस त्यांनी स्वतःच्या टॅक्स्या बाजूला ठेवून वाहतूक नियंत्रकाची जबाबदारी उचलली. घाटरस्त्यावर वाहने अडकू नयेत, पर्यटकांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी घाटात वाहनांची वाहतूक नियोजनबद्ध केली. परिणामी, गर्दी असूनही वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले.
भर पावसात ‘कावेसर वाचवा’ घोषणा ! रहिवाशांचा कावेसर तलाव सुशोभिकरणाला विरोध
सध्या माथेरानमध्ये उन्हाळी पर्यटन हंगामाची सांगता होत असल्यामुळे शुक्रवारपासून गर्दीचा ओघ सुरू आहे. सोमवारपासून शाळा सुरू होत असल्याने अनेक पर्यटकांनी शनिवारी आणि रविवारी माथेरानला भेट दिली. त्यात स्वतःची वाहने घेऊन येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती. यामुळे घाटरस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्य दिसून आले. अशा वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली सेवा स्थगित करून रस्ता मोकळा ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी गाड्यांना ठराविक अंतराने मार्ग दिला, त्यामुळे कोणतीही वाहने घाटात अडकून पडली नाहीत.
संघटनेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी सतत घाटात गस्त घालत होते. त्यांनी पर्यटकांच्या गाड्यांना प्राधान्य दिले आणि प्रवासी टॅक्स्या नियोजनबद्ध पद्धतीने पाठविल्या. त्यामुळे दस्तुरी येथील वाहनतळापर्यंत पोहचण्यास पर्यटकांना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. २४ तास सेवा देणाऱ्या टॅक्सी संघटनेमुळे रात्री उशिरापर्यंतही पर्यटक घाटात दाखल होत होते.
नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेच्या या सामाजिक भानातून उभ्या राहिलेल्या उपक्रमाचे कौतुक स्थानिक नागरिकांसह नेरळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी देखील केले आहे. त्यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीचे अभिनंदन करत, भविष्यातही असे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. हा उपक्रम म्हणजे वाहतूक यंत्रणेवरचा ताण कमी करण्याचा एक यशस्वी प्रयत्न ठरला आहे.